आली समीप पंढरी, संत प्रतिक्षेत सावळा हरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 01:14 PM2019-07-10T13:14:42+5:302019-07-10T13:17:50+5:30
आषाढी वारी सोहळा विशेष; पंढरपुरात दाखल होऊ लागल्या दिंड्या; ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम...’ वारकºयांचा एकच गजर
प्रभू पुजारी
पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू संत तुकाराम, संत सोपानदेव महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज या प्रमुख पालख्यांसह अन्य पालख्या पंढरी समीप आल्या आहेत. शिवाय कोसो अंतर पार करीत विविध भागातील शेकडो दिंड्या हरिनामाचा गजर करीत पंढरीत दाखल होऊ लागल्या आहेत.
आषाढी एकादशीचा सोहळा शुक्रवारी असल्याने अवघ्या पंढरीचा परिसर हरिनामाने दुमदुमून गेला आहे. रेल्वे, एस़ टी़ ने आणि खासगी वाहनाने वारकरी पंढरीत दाखल होऊ लागले आहेत.
मंगळवारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ठाकुरबुवा समाधीजवळ गोल रिंगण आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा उडीचा खेळ भक्तिमय वातावरणात पार पडला़ सायंकाळी टप्पा येथे संत ज्ञानदेव व संत सोपानदेव या बंधूंची भेट झाली. त्यानंतर या दोन्ही पालख्या पंढरपूर तालुक्यातील पहिल्या मुक्कामासाठी भंडीशेगाव येथे विसावल्या.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे टप्पा येथे भक्तिमय वातावरणात धावा झाला़ या धाव्यामुळे वारकºयांचा शीण जाऊन त्यांच्यात एकप्रकारची ऊर्जा निर्माण झाली़ हा पालखी सोहळा पिराची कुरोली येथे मुक्कामी आहे़ तसेच संत एकनाथ महाराज, संत निवृत्ती महाराज, संत मुक्ताई या पालख्या करकंब मुक्कामी आहेत, तर शेगावहून निघालेली संत गजानन महाराजांची पालखी मंगळवेढा येथे मुक्कामी आहे़ एकूणच राज्याच्या विविध भागातून शेकडो किलोमीटर पायी चालत निघालेल्या पालख्या पंढरपूर समीप आल्या आहेत़ सर्व पालखी सोहळ्यामध्ये सुमारे सहा लाखांपेक्षा जास्त वारकरी सहभागी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो़
सर्व पालख्या वाखरी मुक्कामी
- बुधवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा भंडीशेगावहून निघून दुपारी बाजीराव विहीर येथे उभे रिंगण होणार आहे़ जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पिराचीकुरोली येथून निघून बाजीराव विहीर येथे गोल रिंगण होणार आहे़ हे दोन्ही पालख्यांचे हे सर्वाधिक मोठे रिंगण असेल़ त्यानंतर ज्या काही पालख्या पंढरीच्या दिशेने निघाल्या आहेत़ त्या सर्व पालख्या वाखरी येथे मुक्कामी असतील़ त्यामुळे या ठिकाणी भाविकांची गर्दी होणार आहे़
दिंड्यांंची सोय ६५ एकर परिसरात
- राज्याच्या कानाकोपºयातून आषाढी सोहळ्यासाठी येणाºया दिंड्यांची सोय ६५ एकर परिसरात करण्यात आली आहे़ दिंड्यांतील भाविकांसाठी या परिसरात वीज, पाणी, स्वच्छतागृहे, संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त, आरोग्य केंद्र आदी सर्वप्रकारची सोय करण्यात आली आहे़ दिंडी प्रमुखांनी आपण नोंदणी केलेल्या प्लॉटमध्ये तंबू मारावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़
दर्शन रांग पोहोचली गोपाळपूरपर्यंत
- टाळ-मृदंगांचा निनाद... सतत होणारा हरिनामाचा गजऱ... प्रत्येकाला विठ्ठल-रुक्मिणी माता दर्शनाची लागलेली ओढ...परिणामी दर्शन रांगेत सहभागी होण्याची लगबग सुरू आहे़ आषाढी शुक्रवारी असल्याने पंढरीतील सर्व मार्गावरून भाविक येताना दिसून येत आहेत़ पंढरीत दाखल झालेले भाविक पवित्र चंद्रभागा स्नान करून दर्शन रांगेत सहभागी होताना दिसतात़ त्यामुळे ही रांग मंगगळवारी रात्री गोपाळपूरच्या पुढे गेली होती़