आधी लस मिळेना म्हणून ओरड, आता लस आहेत, माणसं येईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:24 AM2021-09-18T04:24:21+5:302021-09-18T04:24:21+5:30
माढा तालुक्यात कोरोना लसीकरण मोहिमेला प्रचंड वेग आला असून, दीड लाख लाभार्थ्यांनी आतापर्यंत पहिल्या किंवा दुसऱ्या डोसचा लाभ घेतलेला ...
माढा तालुक्यात कोरोना लसीकरण मोहिमेला प्रचंड वेग आला असून, दीड लाख लाभार्थ्यांनी आतापर्यंत पहिल्या किंवा दुसऱ्या डोसचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे तालुका लसीकरणाबाबतचा आलेख गेल्या काही दिवसांपासून अगदी जलदगतीने वाढत आहे. शुक्रवारी दिवसभर झालेल्या मेगा कॅम्पमध्ये तालुक्यात २० हजार डोस उपलब्ध होते, त्यापैकी तालुका आरोग्य विभागाने १२ हजार ५०० डोसचे ३३ केंद्रांतून नियोजन केले होते; परंतु रात्री उशिरापर्यंत त्यातील दहा हजारांचा आकडाही पार करता आला नाही. लसी घ्या म्हणून येथील आरोग्य विभागाला लाभार्थ्यांच्या मागे लागावे लागत असल्याचे चित्र आहे.
........................
ग्रामपंचायतीकडूनच सिरिंजची खरेदी
सध्या जिल्हा स्तरावरून लसी मुबलक उपलब्ध होत असल्या तरी सिरिंजचा पुरवठा मात्र खूप कमी होत असल्याचे दिसून येत आहे; परंतु माढा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती लसीकरण मोहिमेत हिरीरीने भाग घेऊन त्यात येथील आरोग्य विभागाला साथ देऊन स्वतः सिरिंज खरेदी करून गावातील लसीकरण मोहीम राबवीत आहेत.
.................
गेल्या काही दिवसांपासून लसी मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्या आहेत. यासाठी आमचा आरोग्य विभाग सतर्क आहे. तालुका १०० टक्के लसीकरण करण्याच्या कामात मदत केली पाहिजे. सर्वांनी लस घेणे आवश्यक आहे. प्रत्येकाला नियोजित लस उपलब्ध आहे. त्यांनी आपापल्या केंद्रांवर जाऊन लस घ्यावी.
-डॉ शिवाजी थोरात, तालुका आरोग्य अधिकारी, माढा
.................