एका बाजूचा रस्ता झाला; दुसऱ्या बाजूचा कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:49 AM2020-12-11T04:49:00+5:302020-12-11T04:49:00+5:30
सध्या शहरात टिकाऊ व दर्जेदार रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यापैकीच एक सोलापूर रस्ता होय. मात्र, या रस्त्याचे एका बाजूचे ...
सध्या शहरात टिकाऊ व दर्जेदार रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यापैकीच एक सोलापूर रस्ता होय. मात्र, या रस्त्याचे एका बाजूचे काम झाले. पण, त्याची उंचीही जास्त झालेली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी जाऊन नागरिकांचे नुकसान झाले. या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम हे पोस्ट ऑफिस चौक ते दत्त वे-ब्रिजपर्यंत पूर्ण झाले आहे. त्यानंतर बालाजी कॉलनी ते राजन मिलपर्यंत फक्त डाव्या बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या निवासी वसाहतींमधील कच्च्या रस्त्यावरून या उंच रस्त्यावर येताना वाहने सहजपणे यावीत, यासाठी पुरेसे रॅम्प केलेले नाही. त्यामुळे तारेवरची कसरत करावी लागते, असे स्थानिक रहिवासी उमेश नेवाळे यांनी सांगितले.
कोट :::::::::::::
शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस ते राजन मिल या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा ठेका आहे. त्यापैकी ६५ टक्के काम पूर्ण केले आहे. आता दत्त वे-ब्रिज ते राजन मिलपर्यंतच्या एका बाजूचे काम बाकी आहे. या रस्त्यावरील नगरपालिकेच्या फुटलेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती, टेलिफोनच्या तुटलेल्या केबलची जोडणी ही कामे संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काँक्रिटीकरण रेंगाळले आहे. या तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर उर्वरित काम महिन्यात पूर्ण करू.
- प्रशांत पैकेकर,
कंत्राटदार