उत्सव अन् इलेक्शनही झाले; होमगार्डची दिवाळी गेली अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 01:11 PM2019-11-07T13:11:57+5:302019-11-07T13:15:01+5:30
व्यथा जवानांची : पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून ड्युटी केली, मात्र अद्याप मानधन मिळाले नाही
सोलापूर : कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात किंवा जिल्ह्यात पोलिसांचा बंदोबस्त वाढला की, त्यांच्या मदतीला होमगार्ड (गृहरक्षक दल जवान) पाठवले जातात. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून हे जवान काम करतात, मात्र लोकसभा निवडणूक झाली, गणपती उत्सव झाला, नवरात्र महोत्सव (दसरा) पार पडला, त्यानंतर लगेच विधानसभा निवडणूक झाली. अद्याप मानधन न मिळाल्याने त्यांची दिवाळी अंधारात गेली, अशी व्यथा होमगार्डच्या जवानांनी व्यक्त केली.
शहरात एकूण ४५0 पुरूष होमगार्ड तर १५0 महिला होमगार्ड आहेत. शहरासह जिल्ह्यातील मिळून २३00 ते २४00 होमगार्ड सध्या कार्यरत आहेत. लोकसभा निवडणुकीत पोलिसांच्या बरोबरीने होमगार्डचा बंदोबस्त लावण्यात आला होता. यानंतर गणेशोत्सव काळात सलग १२ दिवसांचा बंदोबस्त होता. नवरात्र महोत्सव काळात १0 दिवसांचा तर विधानसभा निवडणुकीत १५ दिवसांचा बंदोबस्त देण्यात आला होता. सध्या होमगार्डला वर्षातून सहा महिन्यांचा बंदोबस्त बंधनकारक करण्यात आला आहे. सध्या होमगार्ड ड्युटी करीत आहेत, जेवढी पोलिसांची ड्युटी तेवढीच त्यांची ठेवण्यात आली आहे. प्रामाणिकपणे हे होमगार्ड आपले कर्तव्य पार पाडतात, मात्र त्यांच्या मानधनासाठी शासन पातळीवर उदासीनता दिसून येत आहे. होमगार्डला एका दिवसाच्या बंदोबस्तासाठी ६७0 रूपयांचे मानधन दिले जाते, मात्र ते वेळेवर होत नाही.
होमगार्ड हे रिक्षाचालक, सायकल दुकान चालक, भाजी विक्रेते, खासगी सिक्युरिटी गार्ड, महापालिकेतील रोजंदार आदी मिळेल ती कामे करणारी आहेत. जेव्हा पोलिसांचा बंदोबस्त येतो तेव्हा तत्काळ त्यांना ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश दिले जातात. ही मंडळी आपल्या हातातील कामधंदा सोडून ड्युटीला हजर होतात. बंदोबस्त झाला की एक महिन्यानंतर मानधन मिळेल या आशेवर होमगार्ड काम करतात. दिवसपाळी असो की रात्रपाळी कोणताही विचार न करता ही मंडळी पोलिसांच्या बरोबरीने कर्तव्य बजावतात. लोकसभा निवडणुकीपासून नवरात्र महोत्सवापर्यंत काम केलेल्या या होमगार्डना दिवाळीत मानधन मिळेल अशी अपेक्षा होती. मानधन आले की दिवाळी चांगली साजरी करायची या स्वप्नात असलेल्या होमगार्डच्या पदरी निराशा आली. अशा अवस्थेतसुद्धा ही मंडळी आदेश आला की ज्या ठिकाणी बंदोबस्त आहे, त्या ठिकाणी जाऊन कर्तव्य पार पाडत आहेत.
आम्ही आशेवर काम करतो...
- होमगार्ड म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून काम करतो. आज नाही तर उद्या आम्हाला चांगले दिवस येतील या आशेवर आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. चांगले दिवस येवो अगर न येवो पण सध्याच्या घडीला काम करतोय त्याचे मानधनतरी आम्हाला वेळेवर मिळावे ही अपेक्षा असते. आमचं लग्न झालं आहे, संसार आहे. जगायचं कसं हा प्रश्न आमच्यासमोर असतो. खासगी व्यवसाय व नोकरी करतो मात्र आदेश आला की तिकडचे सोडून इकडे कामावर हजर राहतो. मात्र तिकडचेही उत्पन्न जाते आणि इकडेही वाट पाहावी लागते अशी खंत काही होमगार्ड जवानांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.