धनगर समाजाच्या आरक्षणावर तोडगा निघणार; मुख्यमंत्र्यांनी उद्या बोलाविली मुंबईत बैठक
By Appasaheb.patil | Published: September 14, 2024 05:42 PM2024-09-14T17:42:24+5:302024-09-14T17:43:50+5:30
पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.
आप्पासाहेब पाटील, पंढरपूर : धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून सकल धनगर समाजाच्या प्रतिनिधींचे टिळक स्मारक, पंढरपूर येथे आमरण उपोषण सुरू आहे. पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.
राज्य शासनाच्या शिष्टमंडळातून उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा करून तब्येतीची विचारपूस केली. यावेळी सकल धनगर समाजाच्या मागण्याबाबत उद्या १५ सप्टेंबर २०२४ रोजी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकल धनगर समाजाच्या प्रतिनिधी सोबत बैठक घेणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले.
धनगर आरक्षण प्रकरणी आंदोलन सुरू झाल्यानंतर राज्य सरकारकडून यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारकडून वेळ देण्यात आला आहे. धनगर समाजाच्या तीव्र भावनांचा विचार करून तातडीची बैठक बोलवली आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गासोबत नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्या अशी मागणी आहे.