विकलेल्या वाहनांवरील तुमचे नाव न काढल्यास येणार मोठया अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2022 05:42 PM2022-04-07T17:42:57+5:302022-04-07T17:43:03+5:30
नाव काढले का खात्री करा : वाहन ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया अनेकजण करीत नाहीत
सोलापूर : वाहन विकल्यानंतर परिवहन विभागातील प्रक्रिया पूर्ण करून ते वाहन संबंधितांच्या नावे करावे लागते. ही वाहन ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया अनेकजण करीत नाहीत. त्यामुळे अशा वाहनांचा अपघात झाला किंवा ते चोरीस गेले तर अडचणी येतात. त्यामुळे वाहन विकले; पण तुमचे नाव काढले का याची खात्री करायला हवी.
जुन्या गाडीची विक्री अथवा ती खरेदी करत असाल तर अनेकदा रजिस्ट्रेशन ट्रान्सफर करण्यासाठी त्याला अडचणींचा सामना करावा लागतो. कोणतेही जुने वाहन खरेदी केल्यावर आरसी तुमच्या नावावर करून घ्यावे लागते. त्याशिवाय तुम्ही त्या गाडीचे कायदेशीर मालक होत नाही. मोटार वाहन मालकी हस्तांतरण केल्याशिवाय तुम्हाला वाहनावर हक्क सांगता येत नाही. अपघातावेळी तर अनेक क्लिष्ट प्रक्रियेतून जावे लागते. तेव्हा भविष्यातील त्रासापासून वाचण्यासाठी वेळीच हा बदल करणे गरजेचे आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यात लोक दरवर्षी दुचाकी मोटारसायकल, रिक्षा, चारचाकी कार, मोठी जड वाहने आदी विविध प्रकारची वाहने विक्री करतात. सेकन्ड हॅन्ड वाहन खरेदी-विक्रीचा मोठा व्यवसाय चालतो. मित्र असो किंवा ओळखीच्या लोकांमध्येही असे व्यवहार मोठ्या प्रमाणात चालतात. आरटीओ ऑफिसला जाऊन रितसर ट्रान्सफर करण्यास काही लोक कंटाळा करतात; मात्र हा कंटाळा भविष्यात त्यांना धोकादायक ठरू शकते.
कोणत्या वर्षी किती वाहनांचे झाले ट्रान्सफर?
- २०१८/१९ १९१२३
- २०१९/२० १९७१९
- २०२०/२१ १५६१७
- २०२१/२२ २१२२०
कोणत्या वर्षी किती वाहनांची चोरी?
- २०१८ ६७
- २०१९ ७०
- २०२० १७
- २०२१ ८२
कोणत्या वर्षी किती प्राणांतिक अपघात?
- २०१८ ४९
- २०१९ ४३
- २०२० १६
- २०२१ २१
वाहन ट्रान्सफर करणे सोपे
० वाहन ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला नजीकच्या परिवहन कार्यालयात धाव घ्यावी लागेल. थेट अर्ज करून आरसी बुक तुमच्या नावावर करता येईल. गाडीसंबंधीची सर्व कागदपत्रे शुल्क द्यावे लागेल. त्यानंतर संबंधित तारखेला कार्यालयात हजर रहावे लागेल. कोणत्याही वाहनाच्या खरेदी-विक्रीच्या १४ दिवसानंतर मोटार वाहन मालकी हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करावी, असा कायदा सांगतो. ३० दिवसानंतर आरसी ट्रान्सफर होऊन स्मार्ट कार्डच्या रूपात वाहनधारकाच्या पत्त्यावर पाठविली जाते. जर वाहन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात हस्तांतरित करायचे असेल तर अर्ज क्रमांक २८ चा वापर करण्यात येतो.
वाहन कोणतेही असो ते विक्री करीत असताना, वाहनाची मालकी कायद्याने दुसऱ्याला देणे आवश्यक आहे. वेळच्या वेळी ही प्रक्रिया पूर्ण केल्यास विकत घेणाऱ्याला अन् विकणाऱ्याला भविष्यात अडचण येत नाही.
- विजय तिराणकर, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी