मोहोळमध्ये उड्डाण पूल होणार, विद्यार्थी-नागरिकांचा धोका टळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:23 AM2021-05-09T04:23:13+5:302021-05-09T04:23:13+5:30
चौपदरीकरणाच्या हायवेनंतर शहराजवळील कन्या प्रशाला चौकामध्ये सातत्याने हायवेवर होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला, तर अनेकांना अपंगत्व आले. ...
चौपदरीकरणाच्या हायवेनंतर शहराजवळील कन्या प्रशाला चौकामध्ये सातत्याने हायवेवर होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला, तर अनेकांना अपंगत्व आले. कन्या प्रशालेजवळून हायवे ओलांडणे म्हणजे मृत्यूला सामोरेेे जाणे, अशी भीती निर्माण झाली होती. या ठिकाणी भुयारी मार्गाची मागणी केली होती. त्यानुसार २० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आता विद्यार्थी व नागरिकांचा धोका टळणार आहे.
कन्या प्रशाला चौकात भुयारी मार्गासाठी २००८ पासून गेल्या १४ वर्षांपासून अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्ष व परिसरातील शैक्षणिक संस्थांनी आंदोलने केली होती. या सर्वांच्या मागणीला अखेर यश आले आहे. केंद्रीय मंंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून मोहोळ येथील कन्या प्रशालेजवळील उड्डाण पुलास २० कोटी ६३ लाख रुपयांंच्या कामाची मंजुरी दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागल्याने शहर व तालुक्यातील असंख्य विद्यार्थी व नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
मोहोळमध्ये अनेक शैक्षणिक संकुले आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही जास्त आहे.
शहरातील कन्या प्रशाला चौकालगतच पाच शाळा आहेत. हा रहदारीचा रस्ता असून, या ठिकाणी चौपदरीकरणावरूनच रस्ता ओलांडावा लागत होता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांसह दुचाकीस्वार व नागरिकांना ये-जा करताना
आजतागायत अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर अनेक जणांना गंभीर जखमी होऊन अपंगत्व आलेले आहे. हे अपघात रोखण्यासाठी कन्या प्रशाला चौकामध्ये भुयारी मार्ग व्हावा, यासाठी भीम प्रतिष्ठान, ज्योती क्रांती परिषद, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, मनसे, राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला यासह विविध सामाजिक संघटनांनी विद्यार्थ्यांसह आंदोलने केली होती.
सहा तास हायवे बंद
२००८ साली नेताजी प्रशालेतील विद्यार्थी भानवसे याच्या अपघाती मृत्यूनंतर तब्बल ६ तास हायवे बंद करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये २२ शिक्षकांसह अनेक नागरिकांवर गुन्हे दाखल झाले होते. १४ वर्षांनंतर त्या केसचा निकाल लागला आहे. ही सर्व आंदोलने प्राप्त परिस्थिती लक्षात घेऊन नितीन गडकरी यांनी या उड्डाण पुलास २० कोटी ६३ लाख रुपयांंच्या कामाची मंजुरी दिल्याचे ट्यूटरवरून सांगितले.