भाविकांना रोखण्यासाठी असणार सोलापूर ग्रामीण पोलिसांचे तिहेरी जाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 03:59 PM2020-06-17T15:59:45+5:302020-06-17T16:01:56+5:30
आषाढीनिमित्त पंढरपुरात ग्रामीण पोलिसांची बैठक; कोरोना संसर्ग रोखण्याचा असणार प्रयत्न
पंढरपूर : कोरोना संसर्गजन्य रोगामुळे भाविकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये. यासाठी आषाढी यात्रेचा सोहळा रद्द करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. मात्र तरीही आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी भाविक पंढरपुरात येऊ नये यासाठी पोलिसांचे तिहेरी जाळे असणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.
आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी पंढरपूर विभागामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी बैठक घेतली आहे. यावेळी पंढरपूर, अकलूज, सांगोला, मंगळवेढा या तालुक्यातील उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलीस पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक उपस्थित होते.
या बैठकीमध्ये आषाढी यात्रेमध्ये पंढरपुरात भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी सोलापूर जिल्ह्याला पोलिसांचे तिहेरी जाळे असणार आहे. यामध्ये प्रथम जिल्हा बॉर्डर, तालुका हद्दीवर व शहरात प्रवेश होणाºया ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यामुळे हे तिहेरी जाळे तोडून भाविकांना पंढरपुरात येणे सोपे नसणार असल्याचे अतुल झेंडे यांनी सांगितले.