पावसाळी अधिवेशनात पाणीप्रश्न पेटणार !
By admin | Published: June 2, 2014 12:35 AM2014-06-02T00:35:43+5:302014-06-02T00:35:43+5:30
सांगोल्याच्या शेतीचा प्रश्न; उपोषणासाठी दोन आमदार मुंबईला रवाना
सांगोला : सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न घेऊन आ. गणपतराव देशमुख व आ. दीपक साळुंखे दोन्ही लोकप्रतिनिधी विधानभवनासमोर ३ जूनपासून बेमुदत उपोषणास बसण्याच्या तयारीने रविवारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. यामुळे आता पावसाळी अधिवेशनात सांगोल्याचा पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी वेळोवेळी आंदोलने करून शासनाकडे पाठपुरावा केला आहे, परंतु आजपावतो तालुक्यास टेंभू व म्हैसाळचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे शेतकर्यांतून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, टेंभूचे पाणी बुद्धेहाळ तलावात व म्हैसाळचे पाणी पारे तालुक्यात आणण्यासाठी अंतिम टप्प्यातील जनचळवळीची भूमिका निश्चित करण्यासाठी शनिवार दि. १० मे रोजी आ.गणपतराव देशमुख व आ.दीपकआबा साळुंखे पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पाणी प्रश्नावरची भूमिका मांडली होती. पत्रकार परिषदेत आ.देशमुख व आ.साळुंखे पाटील यांनी टेंभू व म्हैसाळच्या पाण्यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा व आंदोलन करुनही शासन तालुक्यास पाणी देण्यास अपयशी ठरले आहे. दरम्यान, गेल्या २१ दिवसानंतरही शासनाने टेंभू-म्हैसाळच्या पाण्यावर कसलाच निर्णय घेतला नाही. याच्या विरोधात आज रविवार आ.गणपतराव देशमुख, आ.दीपक साळुंखे पाटील मुंबईला रवाना झाले आहेत.
----------------------------
- निर्णय नसल्याने संताप
शासनाने ३१ मे २०१४ पूर्वी दोन्ही योजनेचे पाणी तालुक्यास न सोडल्यास मंगळवार दि. ३ जून २०१४ पासून पावसाळी अधिवेशनाच्या काळात विधानभवनासमोर टेंभू-म्हैसाळ योजनेचा पाणी प्रश्न निकालात काढावा या मागणीसाठी बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता.
-----------------------------
शासनाचे लक्ष वेधणार
विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवार २ जूनपासून सुरू होत आहे. शासनाचे लक्ष वेधून सांगोल्याचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधींनी उपोषणाचा पवित्रा घेतला आहे.