कंदर येथे घर फोडून ६६ हजारांचे दागिने पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:16 AM2021-07-04T04:16:37+5:302021-07-04T04:16:37+5:30
करमाळा : कंदर येथे घराचा कुलूप कोयंडा तोडून चाेरट्यांनी गंठण व अंगठीसह ६६ हजार रुपयांचा ऐवज पळविला आहे. ...
करमाळा : कंदर येथे घराचा कुलूप कोयंडा तोडून चाेरट्यांनी गंठण व अंगठीसह ६६ हजार रुपयांचा ऐवज पळविला आहे. शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी करमाळा पोलिसांत कांतीलाल संदिपान फरतडे (वय ४७, रा. कंदर, ता. करमाळा) यांनी फिर्यादी दिली आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार फरतडे यांच्या पत्नी, मुलगा व सून हे एकत्रित राहत असून, कंदर शिवारात त्यांची सात एकर जमीन आहे. ते पवार वस्तीवर राहतात. १ जुलै रोजी सायंकाळी ९.३० वाजता जेवण आटोपून छतावर झोपण्यासाठी गेले तर फरतडे स्वत: शेतामध्ये उसाला पाणी देण्यासाठी गेले होते. २ जुलैच्या पहाटे तीन वाजता पुतण्या रमेश फरतडे याचा फोन आला. त्याने चोरटे आले आहेत, सावध राहा, असे सांगितले.
त्यानंतर मुलगा सागर याने फरतडे यांना फोन करून याची माहिती दिली. इतक्यात चोरटे खालच्या खोलीतील कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकून दागिने पळविले. चोरट्यांनी अडीच तोळे सोन्याचे गळ्यातील गंठण, ११ हजारांची सोन्याची अंगठी असा ६६ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला.