गुलबर्ग्यातील चोरट्याने सोलापुरातील मोटारसायकली चोरल्या अन् काटेरी झुडपात लपविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 01:14 PM2021-03-19T13:14:03+5:302021-03-19T13:14:08+5:30
पाठलाग करुन एकास अटक : एक लाख ९० हजाराचा मुद्देमाल हस्तगत हस्तगत; सदर बझार गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी
सोलापूर : दुचाकीवरून वेगाने जाणाऱ्या संशयित व्यक्तीचा पाठलाग केला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. चोरलेल्या दुचाकी काटेरी झुडपात लपवून ठेवल्या होत्या. सदर बझार गुन्हे प्रकटीकरण पथकाने सहा दुचाकी हस्तगत केल्या. त्यांची अंदाजे किमत एक लाख ९० हजार इतकी होते.
मोहम्मद इस्माईल रब्बानी (वय ४२, रा. गुलबर्गा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत दत्तात्रय पांडुरंग उपरे (रा. सदर बझार, सोलापूर) यांनी फिर्याद दिली. दि. १६ ते १७ मार्चच्या दरम्यान उपरे यांची घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या अनुषंगाने सदर बझार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक तपास करीत होते. त्यावेळी महावीर चौकातून संशयित व्यक्ती वेगाने दुचाकीवरून गेली. त्याचा पथकाने पाठलाग केला. त्याला पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्याच्याकडे पथकाने अधिक चौकशी केल्यानंतर त्याने शहरातील विविध भागातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे संभाजी तलावाच्या परिसरातील काटेरी झुडपात त्याने चोरी केलेल्या दुचाकी ठेवल्या होत्या. पोलिसांनी त्या हस्तगत केल्या.
यांनी केली कारवाई
^ ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) बापू बांगर, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) अभय डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे, पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील, आश्विनी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड, पोलीस हवालदार ओमप्रकाश मडवळी, अतिक नदाफ, पोलीस नाईक खाजपा आरेनवरु, राहुल आवारे, नितीन गायकवाड, सागर सरतापे, विठ्ठल काळजे, रामा भिंगारे, सचिन गुजरे व अमोल उगले यांनी केली.