चोरट्याने बँक ग्राहकाच्या खिशातून ५० हजार चोरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:16 AM2021-06-05T04:16:54+5:302021-06-05T04:16:54+5:30
शिरभावी (ता. सांगोला) येथील शेतकरी अरविंद आगतराव नलवडे यांनी ३ जून रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास सांगोला येथील ...
शिरभावी (ता. सांगोला) येथील शेतकरी अरविंद आगतराव नलवडे यांनी ३ जून रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास सांगोला येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून शेती व घर खर्चासाठी चेकद्वारे १ लाख २० हजार रुपये काढले होते. त्यानंतर त्यांनी ५०-५० हजार रुपयांचे २ बंडल एका खिशात व २० हजार रुपये दुसऱ्या खिशात ठेवून शेतीला खत खरेदीसाठी सांगोला शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात आले. त्यांनी खिशातील पैसे तपासले. यावेळी ५० हजार रुपयांचे एक बंडल गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी स्टेट बँकेत धाव घेऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक अनोळखी इसम त्यांच्या खिशातील ५० हजारांचे बंडल चोरताना दिसून आला. अरविंद नलवडे यांनी तत्काळ सांगोला पोलीस स्टेशनला येऊन घडला प्रकार पोलिसांना सांगितला. या घटनेची पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी दखल घेऊन सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांना सदर गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहणी केली असता फुटेजमधील टी-शर्ट घातलेला चोरटा रेकॉर्डवरील गुन्हेगार स्वप्नील मारुती घुले यास ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्याकडून चोरलेले ५० हजार रुपये हस्तगत केले. ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब पाटील यांनी केली.