सिद्धेश्वर तलावातील कमळांवरही चोरट्यांचा डोळा; व्यापाऱ्याने ऑर्डर देताच गुपचूप तोडून केली गोळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 12:43 PM2021-06-28T12:43:21+5:302021-06-28T12:43:27+5:30
स्मार्ट सिटीतल्या स्मार्ट चोरीची कहाणी : केवळ पैशासाठी सौंदर्याची खुलेआम तोडणी
सोलापूर : भुईकोट किल्ल्याचा तट अन् नयनरम्य तलावाच्या मधोमध असलेले शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचे मंदिर. तलावातील कमळाच्या फुलांनी होणाऱ्या भाविकांचे स्वागत होत असताना कुणाची नजर लागली की काय, आता ती फुलं एका व्यापाऱ्याच्या ऑर्डरनुसार एक परप्रांतीय कामगार तोडून त्याच्या घरापर्यंत पोहोच करत आहे. आता चोरट्यांचा डोळा या फुलांवर असून, रविवारी सकाळी स्मार्ट सिटीतल्या स्मार्ट चोरीची कहाणी ऐकावयास मिळाली. केवळ पैशासाठी सौंदर्याची खुलेआम तोडणी होत आहे.
शहरातील एका भक्तगणाला आलेला हा अनुभव. हा भक्तगण रविवारी सकाळी सिद्धेश्वर पेठेतून जात असताना त्याची नजर एका परप्रांतीय कामगारावर गेली. तलावातील कमळाची फुलं मुळासकट तोडून घेऊन जात असताना या भक्तगणाने त्याला अडवले. त्याची चौकशी केली असता तो एका व्यापाऱ्याच्या आर्डरनुसार ती फुलं त्याच्या घरापर्यंत पोहोच करण्यासाठी निघाला होता. चार पैसे मिळतील, या आशेने आपण हे काम करीत असल्याची त्याने कबुलीही दिली. एवढ्यावरच न थांबता त्या भाविकाने त्याला तलावाकाठी आणले. त्यावेळी तलावातील कमळाची फुलं मुळासकट गायब असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. अतिस्मार्ट व्यापाऱ्याने परप्रांतीय कामगाराला फुलं आणण्याची होम डिलिव्हरीची ऑर्डर दिली होती.
सुगडी पूजन कट्ट्यालगतचे कमळ गायब
दरवर्षी जानेवारी महिन्यात साजरा होणाऱ्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला साडेनऊशे वर्षांची परंपरा आहे. यात्रेतील मुख्य सोहळा म्हणजे अक्षता सोहळा. सम्मती कट्ट्याजवळ हा सोहळा पार पडत असताना सुगडी पूजनलाही मान आहे. तलावाकाठी असलेल्या सुगडी कट्टा परिसरातील कमळाची फुलंही गायब झाली होती. तलावाकाठी पडलेली कमळाची रोपंही काहींनी नेली होती.
पॅकिंग अन् डिस्पॅचची तयारी सुरक्षा रक्षकाकडून
व्यापाऱ्याची ऑर्डर मिळाली आणि चार पैसेही मिळतील, ही भावना त्या परप्रांतीय कामगाराने बाळगली. मुळासकट तोडण्यात आलेल्या कमळांचे पॅकिंग अन् डिस्पॅचची तयारी मंदिर समितीचा सुरक्षा रक्षकाच्या देखरेखीखाली सुरू असल्याचा आरोपही त्या भाविकाने केला. सिद्धेश्वर तलाव सुधार समिती, देवस्थान पंच कमिटी आणि संबंधित शासकीय विभागाने याकडे लक्ष वेधण्याची विनंतीही त्या भाविकाने केली.