तोंडाला मास्क बांधून चोरट्यांनी मंद्रुप बाजारपेठेतील अकरा दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 08:30 AM2020-06-12T08:30:43+5:302020-06-12T08:30:51+5:30
सीसीटीव्ही कॅमेरे उचकटून फक्त रोकड पळवली; शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली घटना
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील निबंर्गी रोडवर असलेली अकरा दुकाने फोडून चोरट्यांनी रोकड पळविली. शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही चोरी उघडकीस आल्यावर मंद्रुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
दरम्यान, शुक्रवार हा मंद्रूपच्या आठवडी बाजाराचा दिवस, पण कोरोना साथीमुळे सध्या बाजार भरत नाही. तरीही सध्या दुकाने उघडण्यास परवानगी दिल्यामुळे व्यापारी पहाटे पाच वाजता उठून तयारीसाठी गेल्यावर त्यांना दुकाने फोडली असल्याचे लक्षात आले. मंद्रूप बाजारपेठेत निंबर्गी रोडवर ओळीने खत, सिमेंट, किराणा, मोबाईल विक्रीची दुकाने आहेत. यातील पाच दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय आहे. तरीही चोरट्यांनी तोंडाला मास्क बांधून ही दुकाने फोडल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणावरून दिसून आले आहे.
चोरट्यांनी घराशेजारील दुकाने शाबूत ठेवून रस्त्याकडेच्या दुकानावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले आहे. दुकाने फोडून आतील फक्त गल्यातील रोकड लुटून नेली आहे. दुकानातील इतर मालाला चोरट्यांनी हाती लावला नसल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून आले आहे. व्यापाऱ्यांनी माहिती देताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चित्रीकरण ताब्यात घेतले आहे.
विशेष म्हणजे चोरट्यांना दुकानातील सीसी कॅमेराची कल्पना आली होती. जाताना त्यांनी सीसीकॅमेर्याची मोडतोड केल्याचेही दिसून आले आहे. कोरोना साथीमुळे गेले तीन महिने व्यापार ठप्प होता एक जून नंतर दुकाने उघडण्यास परवानगी दिली, त्यामुळे व्यापाऱ्यांनी माल भरून व्यापार चालू ठेवण्यास सुरुवात केली असतानाच चोरट्यांनी आता दुकानांना लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे.