चोरट्यांचा मोर्चा आता दुभत्या जनावरांकडे; दोन लाखांचे पशुधन चोरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:21 AM2021-03-14T04:21:23+5:302021-03-14T04:21:23+5:30
वडाचीवाडी येथील राजेंद्र म्हमाणे हा शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतो. त्यांच्याकडे दूध देणाऱ्या दोन जर्सी गाई, एक ...
वडाचीवाडी येथील राजेंद्र म्हमाणे हा शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतो. त्यांच्याकडे दूध देणाऱ्या दोन जर्सी गाई, एक म्हैस, दोन जर्सी कालवड तर एक शेळी असे पशुधन आहे. त्यांची शेती सोलापूर पुणे महामार्ग लगत असून, ते दररोज रात्री जनावरांना चारापाणी करून गावातील घरी झोपण्यासाठी जातात.
१२ मार्च रोजी राजेंद्र म्हमाणे हे रात्री ९ वाजता नेहमीप्रमाणे चारापाणी करून गावातील घरी झोपण्यासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी १३ मार्च रोजी सकाळी ६ वाजता ते शेतात आले असता त्यांना आपली जनावरे दिसली नाहीत.
त्यांनी मोडनिंब, शेटफळसह आजूबाजूच्या गावात सर्वत्र शोध घेतला. मात्र जनावरे कुठेच मिळून आली नाहीत. त्यामुळे त्यांची तब्बल दोन लाख पाच हजार रुपये किमतीचे पशुधन चोरी झाल्याची खात्री पटली.
याप्रकरणी राजेंद्र म्हमाणे यांनी मोहोळ पोलिसात तक्रार दिली असून, अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा नोंदला आहे. तपास पोलीस नाईक शरद ढावरे करीत आहेत.
----