मुलीच्या लग्नासाठी आणलेल्या दागिन्यांवर चोरट्याचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:22 AM2021-05-13T04:22:46+5:302021-05-13T04:22:46+5:30
चपळगाव येथील मनोज बसवराज उपासे यांच्या मुलीचे लग्न २८ मे रोजी आहे. लग्नासाठी वधू पित्यांनी सोने, कपडे व इतर ...
चपळगाव येथील मनोज बसवराज उपासे यांच्या मुलीचे लग्न २८ मे रोजी आहे. लग्नासाठी वधू पित्यांनी सोने, कपडे व इतर वस्तू खरेदी केल्या होत्या. ११ रोजी उपासे कुटुंबीय जेवण करून घराला कडी कोयंडा लावून छतावर झोपायला गेले. पहाटे उपासे हे खाली आले असता घरचा दरवाजा, कपाट उघडे दिसले. त्यातील कपडे व इतर वस्तू अस्ताव्यस्त पडलेले होते. लॉकरमधील १ लाख २० हजार किमतीचे ४ तोळे वजनाचे सोने, ७५ हजार रोख रक्कम आणि २० हजाराचे चांदीचे दागिने असे २ लाख १५ हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून पोबारा केला.
तसेच रेवणसिद्ध पंडित बुगडे यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून ९० हजाराचे दागिने व ७० हजार रोख रक्कम असे एकूण १ लाख ६० हजाराचा ऐवज लंपास केला. त्यानंतर दीपक चन्नप्पा पाटील, यल्लव्वा मल्लप्पा साखरे, राचप्पा भीमाशंकर हन्नुरे, दीपक बसवण्णा पाटील, पोलीस पाटील चिदानंद हिरेमठ, शरणप्पा ख्याडे असे एकाच रात्री आठ घरफोड्या झाल्या आहेत. या घटनेची खबर मनोज उपासे यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यास दिली. घटनास्थळी अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, सहा. पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी, पोलीस हेडकॉन्स्टेबल अजिंक्य बिराजदार, फिरोज मियावाले, आकाश कलशेट्टी तसेच ग्रामीणचे श्वान पथक व ठसे तपासणी पथक यांनी भेट दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी हे करीत आहेत.
कोट :::::::::
चोरट्याने चोरी केलेल्या घटनास्थळी त्यांनी हाताळलेल्या वस्तूचे ठसे तपासकामी घेतले आहेत. श्वान पथक चोरीच्या जागेवरून बऱ्हाणपूरपर्यंत गेले आहे. त्याच्या आधारे रेकॉर्डवरील, संशयित, नव्याने तयार झालेले गुन्हेगार असतील यांचा शोध घेणार आहे.
- महेश भावीकट्टी, सहाय्यक पोलीस निरीक्षक
---
१२चपळगाव-क्राईम०१
१२ चपळगाव-क्राईम०२