चोरट्यांनी ५१ तोळे सोन्याचे दागिने, एक लाखाची रोकड लांबवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:22 AM2021-04-04T04:22:54+5:302021-04-04T04:22:54+5:30
महुद येथील शैलेश गांधी यांचे महूद-दिघंची रोडवरील अकलूज चौकात शैलेश रेडिमेड अँड स्टेशनरी दुकान आणि निवासस्थान आहे. शुक्रवारी शैलेश ...
महुद येथील शैलेश गांधी यांचे महूद-दिघंची रोडवरील अकलूज चौकात शैलेश रेडिमेड अँड स्टेशनरी दुकान आणि निवासस्थान आहे. शुक्रवारी शैलेश गांधी यांनी सांय. ७ च्या सुमारास दुकान बंद करून जेवण केल्यानंतर रात्री ११ वा. बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावर कुटुंबासह झोपले होते. दरम्यान शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास तीन बुरखाधारी चोरट्यांनी दुकानच्या मागील बाजुने घरात जाणे-येण्यासाठी सेफ्टी दरवाजाचे खिडकीचे गज कटरने कापून घरात प्रवेश केला.
यावेळी चोरट्यांनी बेडरूमच्या कपाटाचे लाँक तोडून ६ तोळ्याच्या ४ बांगड्या, ६ तोळ्याचे २ कंगन, ६ तोळ्याच्या २ पाटल्या, ४ तोळ्याची बांगडी, ८ तोळ्याचे २ मंगळसूत्र, ३ तोळ्याचे गळ्यातील तीन पदरी राणी हार, ६ तोळ्याचे नेकलेस मोठा हार, ४ तोळ्याचे सोन्याचा चोकर, ३ तोळ्याचे नेकलेस, २ तोळ्याच्या ५ लेडिज अंगठ्या, १ तोळ्याची लेडिज चैन व ५ ग्रॅमप्रमाणे २ तोळ्याचे कर्णफुले असे सुमारे २० लाख ४० हजार किमतीचे ५१ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख १ लाख असा एकूण सुमारे २१ लाख ४० हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून लंपास केला.
पहाटे ४ च्या सुमारास शैलेश गांधी यांच्या पत्नीस जाग आली असता त्यांना बेडरुमच्या कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले म्हणून त्यांनी पती शैलेश गांधी यांना झोपेतून उठवून घरात चोरी झाल्याचे सांगितले. याबाबत शैलेश नंदकुमार गांधी यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक संदेश नाळे करीत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर, सोलापूर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन चोरीच्या ठिकाणाची पाहणी केली. पोलीस अधिकारी दिवसभर शैलेश गांधी यांच्या निवासस्थानी चोरट्यांच्या तपासासाठी ठाण मांडून होते. दरम्यान सोलापूर येथून मागवलेले श्वानपथक दुकानाच्या परिसरातच घुटमळल्याने चोरीचा तपास लावणे पोलिसांना आव्हान आहे.
फोटो ओळ :::::::::::::::
अज्ञात तीन बुरखाधारी चोरट्यांनी शैलेश गांधी यांचे घरातील बेडरुमच्या याच कपाटाचे लॉक तोडून ५१ तोळे सोन्याचे दागिने व १ लाखाची रोकड लांबविल्याचे छायाचित्र.