नापिकीत शेळीपालनावर चोरट्यांचा डल्ला; हतबल शेतक-यांची फास घेऊन आत्महत्या
By काशिनाथ वाघमारे | Published: May 5, 2024 04:58 PM2024-05-05T16:58:18+5:302024-05-05T16:58:51+5:30
हतबल झालेल्या या शेतक-याने आत्महत्या केली.
काशिनाथ वाघमारे, सोलापूर : बार्शी तालुक्यात धानोरे येथे एका शेतक-याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार, ५ मे २०२४ रोजी सकाळी ७.३० वाजता निदर्शनास आली. नापिकीत त्यांच्या शेळीपालनावर चोरट्यांनी डल्ला मारला होता. हतबल झालेल्या या शेतक-याने आत्महत्या केली.
शिवाजी वसुदेव गोरे (वय ५०, रा.धानोरे) असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवाजी गोरे यांना नऊ एकर शेती असून यावर्षी अत्यल्प पाऊस झाला. म्हणावे असे उत्पन्न मिळाले नाही. एक मुलगा अपंग असून शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन व्यवसाय सुरू केला. त्यावरही चोरट्याने डल्ला मारला. त्यातच त्यांना मद्यपान व्यसन जडले. गावातील यात्रेपासून ते घरातच बसून होते. परंतु ते कुणाला काही बोलत नव्हते. ५ मे २०२४ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास शौचालयासाठी जातो असे सांगून घराबाहेर गेले. परंतु पुतण्या तानाजी भगवान गोरे हा शेतात कडबा काढण्यासाठी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या दरम्यान गेला असता त्याला चुलते शिवाजी गोरे हे शेतातील लिंबाच्या झाडास काळ्या सुताच्या दोरीने गळफास घेऊन लटकलेले दिसले. तो लगेच चुलत भाऊ वैभव शिवाजी गोरे याला बोलावून घेतले.
याबाबत तानाजी गोरे (वय ३४, रा.धानोरे) यांनी बार्शी तालुका पोलिसात खबर दिली असून अकस्मात मयत अशी नोंद झाली आहे. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल अमित घाडगे हे करीत आहेत.