सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपाचा तिसरा गट उदयाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 01:03 PM2019-03-22T13:03:32+5:302019-03-22T13:06:21+5:30

दोन देशमुखांचा संघर्षात मोहिते-पाटील गटाला आता थेट मुख्यमंत्र्यांकडून मिळाले पाठबळ

The third group of BJP emerged in the politics of Solapur district | सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपाचा तिसरा गट उदयाला

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपाचा तिसरा गट उदयाला

Next
ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपाचा तिसरा गट उदयाला आला

सोलापूर : रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपाचा तिसरा गट उदयाला आला आहे़ सध्या पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे दोन गट जिल्ह्यात कार्यरत आहेत़ गटातटाच्या राजकारणात या नवीन गटाची भर पडल्याने तिसरा पर्याय कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला गटबाजी तशी नवी नाही़ एकसंध काँग्रेसमध्ये जिल्ह्यात वसंतदादा गट आणि पवार गट पूर्वीपासून होते़ वसंत दादा गटाचे नेतृत्व सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्याकडे तर नामदेवराव जगताप पवार गटाचे म्हणून ओळखले जात होते़ जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँकेत दोन्ही गटात नेहमीच शह-काटशहाचे राजकारण चालत असे 
कालांतराने नामदेवराव जगताप गटाची धुरा सुशीलकुमार शिंदे यांना सांभाळावी लागली़ सोलापूर महानगरपालिकेवर याच गटाचा प्रभाव कायम राहिला़ मोहिते-पाटील गटाने पंढरपूर विभागातील ग्रामीण भाग आपल्या वर्चस्वाखाली ठेवला़ मोहिते-पाटील यांनी शहराच्या राजकारणात तर सुशीलकुमार शिंदे यांनी ग्रामीण भागात हस्तक्षेप करायचा नाही, हा जणू अलिखित करारच होता़ त्यामुळेच दोन्ही नेत्यात संघर्षाचे प्रसंग आले.

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर विजयसिंह मोहिते-पाटील यांचा गट वेगळा झाला़ काँग्रेसचे नेतृत्व सुशीलकुमार शिंदे यांना करावे लागले़ राष्ट्रवादीत नवी पिढी जसजशी उदयाला आली तसतसे या पक्षात नवे सुभेदार निर्माण झाले़ त्यांच्यात मोहिते-पाटील गट, बबनराव शिंदे गट निर्माण झाले़ थेट अजित पवारांशी संपर्कात असलेल्या शिंदे गटाने मोहिते-पाटील यांच्यावर कुरघोडी करण्याची संधी सोडली नाही़   
सध्या जिल्ह्यात पालकमंत्री आणि सहकारमंत्र्यांचे भाजपांतर्गत स्वतंत्र गट आहेत़ विधानपरिषद, जिल्हा परिषद, जिल्हा बँक आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दोन देशमुखातील गटबाजी चव्हाट्यावर आली़ जि़ प़ अध्यक्ष संजय शिंदे, बार्शीचे राजेंद्र राऊत, आ़ प्रशांत परिचारक, उत्तम जानकर, आनंद तानवडे ही मंडळी पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करतात़ सहकारमंत्र्यांनी अल्पावधीत राजेंद्र मिरगणे, राजकुमार पाटील, संजय कोकाटे, सचिन कल्याणशेट्टी, शहाजी पवार यांना शक्ती देऊन उभे केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचा जुना दोस्ताना आहे़ पक्ष प्रवेशापूर्वी त्यांनी स्थानिकांना डावलून थेट मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी संपर्क वाढवला़ मुख्यमंत्र्यांनी प्रवेशावेळी आपण आता थेट मोहिते-पाटलांशी बोलू, असे सांगून त्यांना बळ दिले आहे़  यापुढच्या काळात मोहिते-पाटलांचा तिसरा गट जिल्ह्यात सक्रिय होणार हे स्पष्ट झाले़ 

Web Title: The third group of BJP emerged in the politics of Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.