नरभक्षक बिबट्याने घेतला तिसरा बळी; करमाळा परिसरातील दहशत कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 02:24 PM2020-12-07T14:24:23+5:302020-12-07T14:24:29+5:30
करमाळा : चिखलठाण (ता. करमाळा ) येथे नरभक्षक बिबटयाने ऊसतोड करणा-या मजुराच्या फुलाबाई इरचंद कोटली (रा.दसाणे ता.साक्र जि.नंदुरबार) या नऊ ...
करमाळा : चिखलठाण (ता.करमाळा) येथे नरभक्षक बिबटयाने ऊसतोड करणा-या मजुराच्या फुलाबाई इरचंद कोटली (रा.दसाणे ता.साक्र जि.नंदुरबार) या नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर आज दुपारी ११.३० च्या सुमारास हल्ला करून तिला फरफटत घेऊन जात असताना ऊसतोड कामगारांनी बिबटयाचा पाठलाग केल्याने त्या मुलीस बिबटयाने जबडयातून सोडून ऊसाच्या फडात धूम ठोकली. गंभीर जखमी फुलाबाईला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकिय अधिका-याने मृत घोषीत केले आहे. नरभक्षक बिबटयाचा हा करमाळा तालुक्यातील तिसरा बळी आहे.
चिखलठाण (ता.करमाळा) येथील राजेंद्र बळीराम बारकुंड यांच्या लांडाहिरा भागातील ऊस तोडणीचे काम बारामती अँग्रोची टोळी करत होती. ऊसाच्या फडात ऊसतोड मजुर तोडणी करत असताना मागे फडात खेळत असलेल्या फुलाबाईवर नरभक्षक बिबटयाने हल्ला करुन तिला जबडयात धरून फरफटत नेत असताना मुलीने आरडाओरड केली असता ऊसतोड मजुरांनी बिबटयाचा कोयत्याचा धाक दाखवून पाठलाग केला असता मुलीस बिबटयाने जबडयातुन सोडले. गंभीर जखमी फुलाबाईला उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी आणले असता उपचारापुर्वीच तिचे निधन झाल्याचे वैद्यकिय अधिकारी डाँ. अमोल डुकरे यांनी जाहीर केले. बिबटयाने करमाळा तालुक्यात दहशत माजवली असून नरभक्षक बिबटयास दिसताक्षणी गोळया घालण्याचे आदेश राज्याचे मुख्य वनसंरक्षक काकोडकर यांनी स्थानिक वन अधिका-यांना दिले आहेत.