भुईकोट किल्ल्यात आदिलशहाच्या काळात साकारलेली तिसरी विहीर झाली खुली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 10:50 AM2020-02-26T10:50:53+5:302020-02-26T10:53:31+5:30
शिवप्रेमींच्या श्रमदानाचे फळ; बांधकामाचा उत्कृष्ट नमुना, संवर्धनाची गरज
सोलापूर : ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात आदिलशहाच्या काळात तयार झालेली विहीर काटेरी झुडपांमध्ये दडली होती. ही विहीर आता पाहण्यासाठी मोकळी झाली. बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या विहिरीचे संवर्धन करण्याची आवश्यकता असल्याचे इतिहास अभ्यासक सांगत आहेत.
केंद्र शासनाच्या निधीतून भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत. किल्ल्यातील काटेरी झुडपे हटविण्यात आली. सोलापुरातील सामाजिक संघटनांनी यासाठी आठवड्यातून एकदा श्रमदान केले. राज्याच्या विविध भागातील शिवप्रेमी यात सहभागी झाले. झाडीझुडपे हटविण्यासाठी बरेच श्रम करावे लागले. पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी झटले. अद्याप बरेच काम बाकी असले तरी या मोहिमेतून काही चांगल्या गोष्टी घडत आहेत.
भुईकोट किल्ल्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. दस्तावेजात त्याची नोंद आहे. काटेरी झुडपांमुळे आणि पडझड झाल्यामुळे त्या झाकोळल्या गेल्या आहेत. नव्या स्वच्छता अभियानामुळे अशा अनेक वास्तू इतिहासप्रेमींना पाहण्यासाठी खुल्या होत आहेत. त्यापैकीच एक म्हणून तिसºया विहिरीकडे पाहता येईल.
भुईकोट किल्ल्यात एकूणच चार विहिरी आहेत. बाळंतीण आणि नागबावडी या दोन विहिरी खुल्या आहेत. मल्लिकार्जुन मंदिरासमोर तिसरी विहीर असल्याचे सांगितले जायचे. मात्र लोकांना तिथे पोहोचता येत नव्हते.स्वच्छता अभियानामुळे ही विहीर खुली झाली आहे. भोवताली बरीच स्वच्छता करून घेण्यात आली आहे.
अभ्यासकांच्या नजरेतून या विहिरीचे वैशिष्ट्य
- इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर म्हणाले, तिसरी विहीर ही गोड्या पाण्याची विहीर म्हणून ओळखली जाते. विहिरीत पाण्यापर्यंत जाण्यासाठी दोन मार्ग (सोपान) आहेत. ही विहीर चौकोनी आकाराची असून, बरीच खोल आहे. विहिरीच्या भोवती कठडा नाही. मल्लिकार्जुन मंदिराच्या समोरील बाजूस असणारी ही विहीर विजापूरच्या आदिलशहाच्या काळात १६५३ साली तयार झाली आहे. विहिरीवर एक शिलालेख होता. त्यावरही याबाबतची नोंद आहे.
किल्ल्यात जलव्यवस्थापनाचे अत्यंत महत्त्वाचे स्थान असते. किल्ला बांधताना पाणीपुरवठ्याची सोय व्हावी म्हणून किल्ल्यातच विहीर आणि बारवाचे बांधकाम केले जात असे. बाळंतीण विहिरीतून खापरी पन्हाळीद्वारे किल्ल्यात जागोजागी पाणीपुरवठा होत होता. मध्ययुगीन काळात आधुनिक पुलाच्या बाजूला नागबावडी ही विहीर झाली. गोड्या पाण्याची विहीर पाहण्यासाठी खुली होणे खूप महत्त्वाचे आहे. आता या विहिरीचे संवर्धन होणे आवश्यक आहे.
-नितीन अणवेकर, इतिहास अभ्यासक