तहान भागविणारी सीना नदी सांडपाण्यामुळे प्रदूषित!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 05:31 AM2019-12-17T05:31:50+5:302019-12-17T05:32:10+5:30

३० गावांतील पाणीपुरवठा योजना बंद : परिसरातील पाणीही दूषित; होटगी तलाव प्रदूषणाच्या विळख्यात, गावकऱ्यांचे आरोग्य बिघडले

Thirsty river Sina polluted by sewage! | तहान भागविणारी सीना नदी सांडपाण्यामुळे प्रदूषित!

तहान भागविणारी सीना नदी सांडपाण्यामुळे प्रदूषित!

googlenewsNext

शीतलकुमार कांबळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : एकेकाळी शेतीसाठी वरदान असणारी, नागरिकांची तहान भागवणारी सीना नदी आज शहरातील सांडपाण्यामुळे प्रदूषित झाली आहे. नदीच्या पाण्याची दुर्गंधी येत असून, या परिसरातील विहिरी व कूपनलिकेतील पाणीदेखील दूषित झाले आहे. त्यामुळे नदीवर अवलंबून असलेल्या साधारण ३० गावांतील पाणीपुरवठा योजना बंद करण्यात आल्या असून, पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
सोलापूर शहराला दररोज १०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. यातून सुमारे ८० दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते. शहरात एकूण तीन ठिकाणांहून सुमारे ४० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. शिवाय प्रक्रिया न केलेले ४० दशलक्ष लिटर पाण्यापैकी काही पाणी हे शेतीसाठी, तर काही शहरालगतच्या होटगी तलावात सोडले जाते. हे पाणी एमआयडीसी परिसरातून येत असल्याने यात मोठ्या प्रमाणात रसायन असते. या पाण्यामुळे गावकऱ्यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. होटगी तलावाजवळ एक विहीर असून, या तलावातील पाणी झिरपून या विहिरीत येते. विहिरीतून उपसा करताना पाणी शुद्ध केले जाते. हे पाणी होटगी व यत्नाळ या गावांतील लोक वापरतात. या पाण्याच्या वापरामुळे उलटी, जुलाब यासारखे त्रास होत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. प्रक्रिया न केलेले बहुतांश पाणी नाल्यामार्गे सीना नदीत जाते. यामुळे नदीसोबतच होटगी तलावही प्रदूषित झाला आहे.
शहरातील तीन प्रक्रिया केंद्रांमध्ये क्षमतेइतके सांडपाणी येत नाही. भविष्याचा विचार करून जास्त क्षमतेचे केंद्र उभारले असल्याचे सार्वजनिक आरोग्य अभियंता विजय राठोड यांनी सांगितले.

तहान कोणाची भागते? सीना नदीवर अर्जुनसोंड, पाकणी, तिºहे, तेलगाव, नंदूर, वडकबाळ, बंदलगी, कोसेगाव व आष्टी, असे नऊ बंधारे होते. या बंधाºयांवरील पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून या गावांतील लोकांची तहान भागविली जात होती. यातील आठ पाणीपुरवठा योजना बंद झाल्या असून, यावर ३३ गावे अवलंबून होती. शहराच्या वरच्या बाजूला असल्यामुळे याठिकाणी नदी प्रदूषित नाही. त्यामुळे सध्या फक्त आष्टी बंधाºयावरील पाणीपुरवठा योजना सुरू आहे. मोहोळ नगर परिषदेकडून शहरासाठी हे पाणी पुरविण्यात येते.

सोलापूर शहरातील सांडपाणी सीना नदीत सोडल्यामुळे या नदीवरील आष्टी येथील पाणीपुरवठा वगळता सर्व योजना बंद झाल्या आहेत. आष्टी येथील बंधारा हा शहराच्या वरच्या बाजूला असल्यामुळे येथील पाणी प्रदूषित नाही. नदीकाठी असणाºया विहिरी व कूपनलिकेतील पाणीदेखील दूषित झाले आहे. असेच होत राहिले, तर या परिसरातील जमीन नापीक होण्याचा धोका आहे.
-विलास कोकरे, अध्यक्ष,
सीना नदी संघर्ष समिती

फळशेती करता येत नाही
सीना नदीतील पाणी प्रदूषित असल्यामुळे त्यावर फळशेती करता येत नाही. दूषित पाण्यामुळे फळांची झाडे जळून जातात किंवा फळांची वाढ व्यवस्थित होत नाही. यामुळे आम्ही ऊस, ज्वारी, गहू हीच पिके घेतो. फक्त २६५ या प्रकारचाच ऊस या पाण्यात तग धरू शकतो. या उसामधून साखरेचा उतारा व्यवस्थित होत नसल्याने कारखान्यांकडून खूप कमी भावात या उसाची खरेदी होते. -अशफाक शेख,
शेतकरी, वडकबाळ, सोलापूर

Web Title: Thirsty river Sina polluted by sewage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.