निवडणूक कामासाठी सोलापूर विभागातील तेराशे बस धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 01:02 PM2019-10-19T13:02:12+5:302019-10-19T13:04:25+5:30
‘एसटी’चे वेळापत्रक कोलमडणार; पुणे, हैदराबादशिवाय अन्य गाड्या रद्द होण्याची शक्यता
रुपेश हेळवे
सोलापूर : सध्या राज्यात विधानसभेचे वातावरण आहे़ यामध्ये सर्व प्रशासन कामाला लागले आहे़ निवडणुका सुरळीत व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन तर झटत आहेतच सोबतच निवडणूक अधिकाºयांना आपल्या केंद्रावर पोहोचवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी ही एसटी प्रशासनावर देण्यात आली आहे़ अनेक एसटी गाड्या या निवडणूक कामामध्ये गुंतल्या आहेत. यामुळे सोलापूर एसटी आगारामधील वेळापत्रक जवळपास कोलमडणार आहे. पुणे, हैदराबाद मार्ग सोडता सर्व गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे.
सोलापूर आगारातून आज शनिवार १९, रविवार २० आणि सोमवार २१ पर्यंत प्रत्येक दिवशी जवळपास अडीचशे गाड्यांची मागणी निवडणूक कामासाठी करण्यात आली आहे़ यामुळे याचा परिणाम प्रवासी मार्गावर होणार आहे़ आज शनिवार रोजी काहीअंशी परिणाम प्रवासी फेºयांवर होणार आहे़ पण रविवार आणि सोमवार मात्र जास्त प्रभाव पडणार आहे.
यामुळे पुणे, हैदराबाद मार्गावरील गाड्याच्या सुरळीत होणार आहेत़ याचबरोबर गाड्या जशा उपलब्ध होतील त्याप्रमाणे ग्रामीण मार्गावर धावतील़ सध्या सोलापूर आगारामध्ये जवळपास १३५ गाड्या आहेत आणि निवडणूक कामासाठी २५० गाड्यांची मागणी करण्यात आली आहे़ यामुळे इतर आगारातून गाड्यांची मागणी सोलापूर आगाराच्या वतीने करण्यात आली आहे.
कर्नाटक पोलिसांना आणण्यास बस रवाना
- निवडणूक कामासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त इतर राज्यातून मागवण्यात येत आहे़ यामुळे सोलापुरात बंदोबस्तासाठी शेजारी असलेल्या कर्नाटक राज्यातून पोलिसांची कुमक मागवण्यात येत आह़े़ यामुळे कर्नाटक पोलिसांना आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्ह्यातून ४३ गाड्या रवाना झाल्या आहेत़ यामध्ये सोलापूर आगाराच्या ११ एसटी बससह ४३ बस गुरुवारी रात्री गेल्या आहेत़
- अनेक एसटी बस निवडणूक कामामुळे पाठवण्यात येणार आहेत. यामुळे रविवार आणि सोमवार रोजी गाड्यांची कमतरता असणार आहे़ यामुळे अनेक मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर पुणे आणि हैदराबाद मार्गावरील गाड्या सुरळीत चालतील व इतर मार्गावरील गाड्या मात्र विस्कळीत होणार आहेत, अशी माहिती स्थानकप्रमुख पी. हनगल यांनी दिली.