सोलापूर जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार ग्रामस्थांची तहान भागतेय टँकरच्या पाण्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 03:06 PM2019-02-19T15:06:28+5:302019-02-19T15:07:40+5:30
सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे टंचाई निर्माण झाल्याने जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार ९३३ लोकसंख्येची तहान टँकरच्या पाण्यावर भागविण्यात ...
सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे टंचाई निर्माण झाल्याने जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार ९३३ लोकसंख्येची तहान टँकरच्या पाण्यावर भागविण्यात येत आहे. यासाठी ५८ गावांत ५१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जनावरांच्या चाºयाचा प्रश्नही गंभीर झाल्याने जिल्हाभरात ४६ ठिकाणी छावण्या सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला आहे. मात्र हे प्रस्ताव प्रलंबित असून, अजून एकाही छावणीस मंजुरी देण्यात आली नाही.
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक घेण्यात येते. सोमवारी पालकमंत्री दौºयानिमित्त व्यस्त असल्याने महसूल उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे यांनी टंचाई आढावा बैठक घेतली. टँकरचा प्रस्ताव असलेल्या अन्य ४ ठिकाणीही तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना केल्या.
शासनाच्या १९ टँकरमधून तर ३२ खासगी टँकरने टंचाई गावांत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. खासगी टँकरच्या खेपांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या वाहनावर जीपीएस प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे टँकरच्या वाहतुकीचा मार्ग व तपशील आॅनलाईन दिसून येतो. टँकरने पाणीपुरवठा करताना गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.
सांगोला तालुक्यात चारा छावणी सुरू करण्यासाठी ३३ ठिकाणचा प्रस्ताव आला आहे. करमाळा तालुक्यात छावणी सुरू करण्यासाठी ८, मंगळवेढा तालुक्यातील ३ तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील २ ठिकाणी छावणी सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार जागा व आवश्यक सुविधांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रांताधिकारी यांना दिले आहेत. प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडून याबाबत अहवाल न आल्याने एकाही छावणीला मंजुरी मिळाली नाही.