तीस टक्के लोक व्यसनमुक्त होतील; मानसोपचार तज्ज्ञांचा विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 11:58 AM2020-04-22T11:58:36+5:302020-04-22T12:06:18+5:30
लॉकडाउनचा असाही फायदा; व्यसन सोडणाºयांसाठी लॉकडाउनचा काळ हा सुवर्णकाळ
सोलापूर : सध्या सोलापूरसह देशभरात लॉकडाउन सुरू आहे. यातच सोमवारपासून सोलापुरात संपूर्ण संचारबंदी करण्यात आली आहे. ही संचारबंदी आणि लॉकडाउन हे सध्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी खूप महत्त्वाचे आहेच, सोबतच ज्यांना व्यसन सोडायची इच्छा आहे पण ते सोडू शकत नव्हते त्यांच्यासाठी लॉकडाउनचा काळ हा सुवर्ण काळ असू शकतो. या लॉकडाउन काळात व्यसनी वस्तू न मिळाल्यामुळे जवळपास तीस ते चाळीस टक्के लोक हे व्यसन सोडू शकतात, असा विश्वास मानसोपचार तज्ज्ञ डॉ. गंगाधर कोरके यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केला.
साधारणत: अठरा ते तीस वयोगटातील अनेक तरुणवर्ग हा शौक म्हणून व्यसन करत असतो आणि तीस ते साठ वर्षांपर्यंतचा वर्ग हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे व्यसन करत असतो. व्यसन करण्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे व्यसनाची उपब्धता. म्हणजेच तंबाखू, दारू, चरस, गांजा इत्यादी. यांची सहजरीत्या उपलब्धता ही खूप महत्त्वाची असते. पण सध्या अचानकपणे लॉकडाउन झाले. यामुळे व्यसन करणाºयांना आपल्या व्यसनाचा साठा करून ठेवण्याची संधी मिळाली नाही.
यामुळे अनेक व्यसन करणाºयांना वाटत होते की, आपण हे व्यसन केले नाही तर आपण जगूच शकत नाही, आपलं डोकं काम करत नाही, झोपच येणार नाही असे त्यांना वाटत होते. पण त्यांना गेल्या किंवा येत्या अनेक दिवसांपर्यंत व्यसनी वस्तू न मिळाल्यामुळे त्यांच्यात आपण व्यसनाशिवाय जगू शकतो हा आत्मविश्वास आलेला असतो. यामुळे अनेक लोक व्यसनापासून दूर जाऊ शकतात. याचबरोबर सध्या माणूस हा घरातच थांबून आहे. यामुळे त्याला घरच्यांचा पाठिंबाही मिळत आहे. यामुळे कोणत्याही छोट्या-मोठ्या करणामुळे व्यसनाकडे वळणारा माणूस व्यसनाची उपलब्धता नसल्यामुळे तो यापासून लांब जाऊ शकतो. यातूनच त्याचे व्यसन सुटू शकते.
व्यसन सुटण्यापूर्वीची लक्षणे
- जे लोक व्यसन करत होते, ते आता अचानक बंदिस्त झाले. त्यांच्याकडचा व्यसनाचा साठा संपला. आपल्या सर्व मित्रांना विचारूनही कोठूनही व्यसन न मिळाल्यामुळे ते थोडे चिडखोर स्वभावाचे बनलेले असत. त्यांना झोप न येणे, भांडण करणे असे होत असते. पण तीन-चार दिवसात व्यसनी वस्तू न मिळाल्यास त्यांच्यातील ही लक्षणे कमी होऊ लागतात. त्यांना एकप्रकारे आपण व्यसनाशिवाय जगू शकतो, असा आत्मविश्वास येऊ लागतो. यालाच वैद्यकीय भाषेत ‘विड्रॉल फेज’ म्हटले जाते. हा कालावधी जवळपास आठ दिवसात संपून जातो.
या वयोगटातील व्यसनी व्यक्ती व्यसन सोडण्याची शक्यता जास्त
व्यसन करणारे हे १८ ते ३० वयोगट आणि तीस ते साठ वयोगटापर्यंतचा एक गट असतो. यातील दुसरा गट म्हणजेच तीस वर्षांपुढील लोकांना आपल्या व्यसनाशिवायही जीवन जगण्याचा आनंद कळायला सुरुवात होते, त्यांना जास्त फरक पडू शकतो. पण ज्यांना सोडायची इच्छाशक्ती असते अशांना हा काळ जास्त प्रभावी असेल, असे मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात.
लॉकडाउनमुळे आपणांस कमीत कमी गरजा कळतात. आपण खूप अल्प गोष्टीतही संतुष्ट राहू शकतो. प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक पाहणे हेही गरजेचे आहे. यामुळे अनेकांना जीवनाचे महत्त्व कळते. लॉकडाउनमुळे तीस वर्षांपुढील व्यसन करणारे व्यसन सोडू शकतात, असा अंदाज आहे. यामुळे हा लॉकडाउन व्यसन सोडणाºयांसाठी सुवर्णसंधी म्हणायला हरकत नाही.
- डॉ. गंगाधर कोरके,
मानसोपचार तज्ज्ञ.
जे कॉलेज जीवनात व्यसन सुरू करतात आणि ती सोडायची इच्छा असूनही सोडू शकत नाहीत त्यांना हा सुवर्ण काळ ठरू शकतो. कारण व्यसन हे व्यसनाच्या साहित्य उपलब्धतेवर अवलंबून असते. आता उपलब्धता बंद झाल्यामुळे व्यसन हे पूर्ण बंद होऊ शकते. यासाठी तीस ते चाळीस दिवसांचा कालावधी लागतो, पण सुरुवातीचे आठ दिवस खूप त्रास होतो.
- डॉ. आतिश बोराडे, मानसोपचार तज्ज्ञ