एवढा राग बरा नव्हे... सोलापुरात दोघांनी फिनेल, तर जिल्ह्यात तिघांनी विष घेतलं; एका मुलीचा समावेश
By विलास जळकोटकर | Published: July 19, 2023 07:28 PM2023-07-19T19:28:08+5:302023-07-19T19:28:38+5:30
जिल्ह्यात तिघांपैकी दोघांनी शेतात आणि एकानं घरी कीटकनाशक प्राशन केलं. पाचही जण सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.
सोलापूर : रागाच्या भरात टोकाचं पाऊल उचलण्याचे प्रकार अलिकडे मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. मंगळवारी व बुधवारी दोन शहरामध्ये तर तीन जिल्ह्यात वेगवेगळ्या घटना घडल्या. शहरात दोघांनी आपापल्या घरी फिनेल प्राशन केलं. जिल्ह्यात तिघांपैकी दोघांनी शेतात आणि एकानं घरी कीटकनाशक प्राशन केलं. पाचही जण सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.
शहरातल्या विजापूर रोड बेघर हौसिंग सोसायटीत राहणाऱ्या प्रशांत भीमराव गायकवाड (वय- ४०) याने रागाच्या भरामध्ये कोणालाही काहीएक न सांगता मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास फरशी पुसण्यास वापरात येणारे विषारी फिनेल प्राशन केले. काही वेळानं त्रास होऊ लागल्यानं पत्नी रेखा गायकवाड हिने तातडीने शासकीय रुग्णालय गाठलं. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
दुसरी घटना जुना देगाव नाका परिसरामध्ये घडली. इथे राहणाऱ्या प्रगती नागनाथ ईश्वरकट्टी (वय- १७) या तरुणींनी त्रागा करुन रागाच्या भरामध्ये बाथरुम व फरशी पुसण्याचे फिनेलचे एक टोपण प्राशन केले. मंगळवारी रात्री नऊ वाजता ही घटना घडली. यामुळे छातीमध्ये धडधड होऊन त्रास होऊ लागला. भावानं तिची स्थिती पाहून तातडीने शासकीय रुग्णालय गाठलं. तिच्यावर उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
तिसरी घटना सोलापूर जिल्ह्याच्या लगत असलेल्या पांघरधरवाडीची आहे. इथल्या किशोर महादेव शिंदे (वय- २८) या तरुण शेतकऱ्यानं बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास राहत्या घरी कौटुंबिक वादातून संतापाच्या भरामध्ये पिकावर फवारण्याचे कीटकनाशक प्राशन केले. काही वेळानं अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तातडीने वाहन करुन मित्र महेश साक याने सोलापुरात शासकीय केले आहे.
चौथी घटना सावरगाव (ता. तुळज़ापूर ) येथे घडली. आकाश रामचंद्र फंड या तरुणाने स्वत:च्या शेतामध्ये निराशेतून कीटकनाशक प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्याला सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. तेथून वाहनाने मित्र सोमनाथ काडगावकर याने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.
पाचवी घटना मोहोळ तालुक्यातील मोरवंची येथे बुधवारी पहाटे सव्वा दोनच्या सुमारास घडली. भरत पांडुरंग रोकडे (वय- २३)या तरुणाने शेतात तणनाशकावर फवारण्यासाठी आणलेले विषारी औषध दारुच्या नशेत प्राशन केले. यानंतर त्याला उलट्या झाल्यानं वडील पांडुरंग यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.