मुलांच्या तुलनेत मुलीच वरचढ; बारावी परीक्षेत सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९२.९७ टक्के
By Appasaheb.patil | Published: May 21, 2024 04:51 PM2024-05-21T16:51:52+5:302024-05-21T16:54:13+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला.
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता आला. यंदा सोलापूर जिल्ह्यातील बारावीचा निकाल ९२.९७ टक्के लागला आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांचे प्रमाण ९०.८६ तर मुलींचे प्रमाण ९५.७५ टक्के एवढा निकाल लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या परीक्षेच्या निकालामध्ये जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलीच वरचढ ठरल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. बारावीच्या परीक्षेला बुधवार, २१ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली होती. बारावीच्या परीक्षेसाठी सोलापूर जिल्ह्यातील ११८ केंद्रांवरून ५६ हजार ५९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर झाला. ५६ हजार ५९९ पैकी ५२ हजार ६२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलांची संख्या ३२ हजार १७५ तर मुलींची संख्या २४ हजार ४२४ एवढी आहे. कोरोना काळात मिळालेले गृह परीक्षा केंद्र, कमी अभ्यासक्रम आणि अतिरिक्त वेळ या सवलतींचा फायदा घेत विद्यार्थ्यांनी दोन वर्षे शिक्षण मंडळाच्या मागील वर्षीच्या निकालात भरारी घेतली होती. यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या निकालातही वाढ झाली होती. मात्र, सवलती बंद होताच सोलापूरच्या निकालाची टक्केवारी कमी झाली हाेती. यंदा मात्र सोलापूर जिल्ह्याने काहीशी कामगिरी सुधारली आहे.