राज्यातील त्या आमदारांना आवडला सोलापूर जिल्हा परिषदेच्या सायकल बँकेचा पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2022 12:37 PM2022-06-16T12:37:45+5:302022-06-16T12:37:51+5:30
१६ सायकली भेटही दिल्या : उपक्रमाचे कौतुक
सोलापूर : पंचायत राज समितीच्या दौऱ्यातील आमदारांना सायकल बँकेची संकल्पना आवडली. बैठकीत असलेल्या १६ आमदारांनी प्रत्येकी एक सायकल बँकेला देण्याचे कबूल केले. एवढ्यावरच न थांबता त्वरित १६ सायकली आणूनही दिल्या.
पंचायत राज समिती ही तीन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आली आहे. दौऱ्याची सुरुवात ही बुधवार, दि.१५ जून रोजी झाली. जिल्हा परिषदेच्या कामांची पाहणी करत होते. यावेळी समिती समोर मुलींसाठी चालविलेल्या सायकल बँकेची माहिती समितीच्या सदस्यांना कळाली.
ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण हे अनेक कारणांनी थांबते. त्यातील एक कारण म्हणजे मुलींना शाळेत जाताना वाहनांची नसणारी सोय. अनेक मुलींकडे सायकल नसल्याने त्या शाळेत जाऊ शकत नाहीत. हे ओळखूनच सोलापूर जिल्हा परिषदेने सायकल बँकेच्या उपक्रमास सुरुवात केली.
---------
काय आहे सायकल बँक उपक्रम ?
सोलापूर जिल्हा परिषदेने ‘स्वच्छ शाळा-सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील मुलींसाठी ‘सायकल बँक’ सुरू केली आहे. सीईओ दिलीप स्वामी यांनी स्वतः एक सायकल देऊन या बँकेची मुहूर्तमेढ रोवली. या प्रेरणेतून अनेकांनी हातभार लावला. जिल्ह्यात पहिल्यांदाच सायकल बँक स्थापन करून ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी केलेली ही मदत खूपच चांगली ठरली आहे.