कोरोनातून बरे झालेल्यांनाही घ्यावी लागणार कोरोनाची लस; तज्ज्ञांचे व्यक्त मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 11:09 AM2020-12-01T11:09:30+5:302020-12-01T11:10:54+5:30
आरोग्यसेवेवरील भार कमी होण्यासाठी लसीकरण गरजेचे
सोलापूर : कोरोनातून बरे झाल्याने शरीरात अँटीबॉडी तयार होते. त्यामुऴे लस घेण्याची गरज नाही असा समज आहे. पण, या आजारातून बरे झालेल्यांनाही लस घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
देशभरात फेब्रुवारी महिन्यापासून लसीकरणाला सुरुवात होत आहे. पहिल्या टप्प्यात दिल्या जाणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसीकरणाची यादी तयार करण्यात येत आहे. या लसीकरणाबाबत सोशल मीडियावर अनेक चुकीचे संदेश फिरत आहेत. त्यात एकदा कोरोना होऊन गेल्यास त्या व्यक्तीला लस देण्याची आवश्यकता नसल्याचा मेसेजही आहे; मात्र अशा लोकांनाही लस देण्याची गरज आहे.
कोरोनावर मात करण्याचा दर जास्त असला तरी रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी लस देणे गरजेचे आहे. देशभरात वैद्यकीय सेवा मर्यादित असताना रुग्णवाढ झाल्यास आरोग्यसेवा कोलमडू शकते. प्रतिबंधक लसीमुळे कमीतकमी रुग्ण रुग्णालयात दाखल होतील. लस घेताना रुग्णांकडून संमतीपत्रक घेतले जाते. त्यांच्या संमतीनेच लस देण्यात येईल.
अँटीबॉडीज किती दिवस टिकतात यावर नाही एकमत
कोरोना बरा झाल्यानंतर ठराविक काळापर्यंतच अँटीबॉडीज शरीरात टिकतात. याविषयी झालेल्या संशोधनातून अँटीबॉडीज हे तीन किंवा सहा महिने रहात असल्याचे समोर आले आहे. यावर अद्याप संशोधन सुरु असून एकमत झाले नाही. आजार नवा असल्याने या संशोधनाला वेळ लागेल. सध्या काही असेही रुग्ण ज्यांना आजार होऊन गेला असतानाही त्यांच्यात अँटीबॉडीज तयार झाल्या नाहीत.
कोणता आजार आहे त्यावर त्या आजाराशी लढणारे अँटीबॉडीज किती काळ शरीरात टिकतात हे अवलंबून असते. बहुतांश आजारांसाठी पुन्हा लस घ्यायची गरज नसते. पण, कोविडचे तसे नसून लसीमुऴे तयार होणाऱ्या अँटीबॉडीज किती दिवस टिकतील हे सांगता येत नाही. त्यामुळे कोरोना होऊन गेला असता तरी प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे.
- डॉ. राजेश चौगुले, जनऔषध वैद्यक शास्त्रज्ञ, शासकीय रुग्णालय