आषाढीपूर्वीच दररोज हजारो भाविक पांडुरंग चरणी लिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:16 AM2021-07-16T04:16:23+5:302021-07-16T04:16:23+5:30
त्यामुळे वर्षानुवर्षे या प्रमुख संतांच्या पालख्या व दिंड्यांसोबत चालणाऱ्या लाखो भाविकांची सलग दुसऱ्या वर्षी यात्रा हुकणार आहे. तरीही काही ...
त्यामुळे वर्षानुवर्षे या प्रमुख संतांच्या पालख्या व दिंड्यांसोबत चालणाऱ्या लाखो भाविकांची सलग दुसऱ्या वर्षी यात्रा हुकणार आहे. तरीही काही भाविक यात्रा चुकविण्याच्या मन:स्थितीत नाहीत. म्हणून १० जुलैपासून पालख्यांसोबत चालणारे भाविक वारकरी दररोज बस, खासगी वाहनाने पंढरपुरात येऊन चंद्रभागा स्नान, नामदेव पायरीसह कळसाचे दर्शन घेऊन वारी पोहोच करून परतत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मंदिर परिसरात पहाटेपासून संध्याकाळी ४ पर्यंत मोठी गर्दी पहावयास मिळत आहे.
व्यावसायिकांची लगबग
कोरोनामुळे सलग दुसरी आषाढी यात्रा रद्द झाली आहे. वर्षभरात भरणाऱ्या प्रमुख यात्रांवरही शासनाचे कठोर निर्बंध आहेत. विठ्ठल मंदिरही मागील वर्षी जवळपास आठ महिन्यांपेक्षा जास्त व यावर्षीही तब्बल चार महिन्यांपासून मंदिर बंद आहे. त्यामुळे मंदिर परिसरात तुळशीची माळ, प्रसाद, हार, तुरे, मूर्ती, कळस, फोटो, पेढे, खेळणी, कपडे, अगरबत्ती आदी प्रासादिक साहित्य विकणाऱ्या व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षीची वारी झालीच पाहिजे, अशी मागणी सर्वसामान्य वारकरी, व्यापाऱ्यांमधून होत होती. मात्र यावर्षीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यात्रा झाली, पंढरपुरात पुन्हा संचारबंदी लावली असली तरी आषाढी यात्रा सोहळ्यापूर्वी पंढरपुरात वारी पोहोच करण्यासाठी दररोज येत असलेल्या हजारो भाविकांमुळे या व्यावसायिकांची लगबग पुन्हा सुरू झाली असल्याचे चित्र आहे.
पोलीस बंदोबस्तात वाढ
आषाढी यात्रा सोहळा आणखी पाच दिवसानंतर असला तरी दररोज वारी पोहोच करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक दाखल होत आहेत. त्यादृष्टीने पोलीस प्रशासनानेही बंदोबस्तामध्ये वाढ केली आहे. हे पोलीस चंद्रभागा वाळवंट, पंढरपूर शहरातील प्रमुख मार्ग, मंदिर परिसरात तळ ठोकून आहेत. ते भाविकांना फिजिकल डिस्टन्सचे पालन करा, कोरोनाच्या नियमांचे पालन करा, पुढे लावलेली संचारबंदी याविषयी माहिती देताना दिसत आहेत.
नामदेव पायरी, कळसाच्या दर्शनावरही भाविक समाधानी
मागील एक वर्षभरापासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे वारी करणारे भाविक दर्शनासाठी येणारे वारकरी व्याकूळ आहेत. प्रत्येकवर्षी आषाढीला विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग जवळपास १० कि.मी. पेक्षा जास्त लांब असते. त्यावेळी ज्यांना पदस्पर्श दर्शन घेणे शक्य नाही, ते भाविक नामदेव पायरी व कळसाचे दर्शन घेऊन धन्यता मानताना दिसतात. मात्र गेल्या वर्षीपासून आषाढी यात्रा सोहळाच रद्द होता. याशिवाय पंढरपुरात भरणाऱ्या कार्तिकी, चैत्री, माघी या यात्राही रद्द झाल्याने पदस्पर्श दर्शन घेणे जवळपास दुरापास्त झाले आहे. त्यामुळे जे भाविक येतील ते नामदेव पायरी व कळसाचे मिळणारे दर्शनही थोडे थोडके नसे म्हणत यावरच समाधान मानताना दिसत आहेत.