हजारो नवी मुंबईकरांनी अनुभवले ‘सोलापूर फेस्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 05:39 PM2019-02-04T17:39:18+5:302019-02-04T17:41:59+5:30
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी तसेच सोलापूर जिल्ह्यात उत्पादित होणाºया विविध वस्तूंना सोलापूरबाहेर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या ...
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी तसेच सोलापूर जिल्ह्यात उत्पादित होणाºया विविध वस्तूंना सोलापूरबाहेर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नवी मुंबईत आयोजित केलेल्या तीन दिवसीय सोलापूर फेस्ट-२०१९ ला ५० हजारांहून अधिक मुंबईकरांनी भेट दिली. सोलापूरच्या वस्तू खरेदी करून नवी मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. सोलापूरच्या या संस्कृतीचे देशभरात दर्शन घडविणारा असल्याच्या भावना सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केल्या.
सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे पुण्यानंतर सोलापूर फेस्टचे आयोजन नवी मुंबई खारघर येथे करण्यात आले होते. ३ फेब्रुवारी रोजी या फेस्टच्या समारोप कार्यक्रमप्रसंगी सहकारमंत्री सुभाष देशमुख बोलत होते. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना, सोलापूरच्या संस्कृतीला मोठी परंपरा आहे. सोलापूरच्या खाद्यपदार्थांची चव, वस्तूंची खरेदी करताना मुंबईकर आनंदी झाले. आम्हाला नावीन्यपूर्णत: पाहावयास मिळाली. लवकरच ठाणे येथे सोलापूर फेस्टचे आयोजन करा, त्यास आम्ही हवे ते सहकार्य करू असे मनोगत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
सोलापूरच्या परंपरा, खाद्य संस्कृती, वस्तूंना प्रचंड मागणी वाढत आहे. त्यामुळे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली १ ते ३ फेब्रुवारी दरम्यान सोलापूरची श्रीमंती दाखविण्याचे काम सोलापूर सोशल फाउंडेशनद्वारे केले.या फेस्टच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याची संस्कृती, श्रीमंती नवी मुंबईकरांना दाखविण्यात आली.
यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन, कृषी, व्यापार, उद्योग, दळण- वळण, सांस्कृतिक, कला, क्रीडा अशा अनेक क्षेत्रात वैविध्यपूर्ण गोष्टीची माहिती विविध माध्यमातून दाखविण्यात आली. या वैशिष्ट्यांचा प्रचार प्रसार करण्याची गरज ओळखून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी हा महोत्सव भविष्यात संपूर्ण महाराष्ट्र व देशातील काही भागात करण्याची घोषणा केली. नवी मुंबईत आयोजित केलेल्या या उपक्रमाने एकूणच सोलापूरच्या विकासाला चालना मिळाली आहे.
महिला बचत गटाच्या वस्तूंना बाजारपेठ मिळाली आहे.
नोव्हेंबर २०१८ मध्ये पुणे येथील पंडित फार्ममध्ये सोलापूर फेस्ट आयोजित केले होते. नवी मुंबईत मिळालेल्या उदंड प्रतिसादाने मूळचे सोलापूरकर भारावून गेले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील विविध उत्पादनांचे ब्रँडींग करण्यात आले. विशेषत: नवी मुंबईतील सोलापूर फेस्टमध्ये आॅथर्स गॅलरीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील लेखकांची पुस्तके मुंबईकरांना पाहता आली.
तीन ट्रक चादरी विकल्या
नवी मुंबईकरांनी सोलापूर फेस्टच्या समारोपाच्या तिसºया दिवशी उदंड प्रतिसाद मिळाला. सुमारे ५० हजारांहून अधिक जणांनी सोलापूरच्या संस्कृतीचा अनुभव घेतला. अखेरच्या दिवशी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने सोलापूरची अध्यात्मिक, सांस्कृतिक ओळख करून दिली. संध्याकाळी सोलापूरच्या चटकदार खाद्य पदार्थांवर ताव मारून विविध वस्तूंची खरेदीही केली. सुमारे पाच कोटींची उलाढाल या फेस्टच्या माध्यमातून झाली. अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक करत सोलापूर सोशल फाऊंडेशनची माहिती घेतली.