शहरासह ग्रामीण भागातील हजारो नागरिक डेंग्यूसदृश तापाने फणफणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:26 AM2021-09-05T04:26:58+5:302021-09-05T04:26:58+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला. ग्रामीण भागामध्ये रुग्ण आढळून आले. ती संसर्गाची लाट थोड्याबहुत प्रमाणात कमी झाली ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला. ग्रामीण भागामध्ये रुग्ण आढळून आले. ती संसर्गाची लाट थोड्याबहुत प्रमाणात कमी झाली असली तरी लगेच पावसाळा सुरू झाला. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर आजाराचे प्रमाण वाढले. पाऊस जास्त झाल्यामुळे जागोजाग साचलेले पाणी, ग्रामीण भागातील घाण कचरा, अस्वच्छता, नाल्यांचे पाणी, पिण्याचे दूषित पाणी त्यामुळे डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले. गावागावात ताप, सर्दी, खोकला, हिवताप असे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत.
सर्दी, तापाच्या रुग्णाने दवाखाने फुल्ल
पाऊस मोठ्या प्रमाणावर पडल्यामुळे ग्रामीण भागात सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी असे रुग्ण आढळून येत आहेत. शासकीय आरोग्यसेवा तेवढ्या प्रमाणात कार्यरत नसल्यामुळे अनेक रुग्णांना खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावा लागत आहे. मंगळवेढा शहरातील खासगी दवाखान्यांमध्ये महिला, लहान मुले, बालके व पुरुष, महिला असे रुग्ण आढळून येत आहेत. शहरातील प्रत्येक खासगी दवाखान्यात रुग्णांची संख्या वाढली आहे. तापाचे रुग्ण व बालकांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. डेंग्यूसदृश ताप, पांढऱ्या पेशी कमी होणे, टायफाइड, मलेरिया अशा प्रकारच्या आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
कोट :::::::::::::::::::
कोरोनाचा प्रादुर्भाव थोड्याफार प्रमाणात कमी होत असताना गेल्या काही दिवसांपासून चिकुन गुन्या, डेंग्यू, मलेरिया आदी आजारांची साथ सुरू आहे. रुग्णाला डास चावल्यानंतर प्रथम ताप येतो. सांधेदुखी, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा, मळमळ आदी या आजारांची लक्षणे आहेत. या आजारात पेशंटच्या रक्तपेशी कमी होण्याचे प्रमाण असते. वरील लक्षणांपैकी कोणतेही लक्षण आढळल्यास जवळील डॉक्टरकडे संपर्क साधावा.
- डॉ. विवेक निकम
मंगळवेढा