Health; हजारामागे दोनशे महिलांना जडलाय थायरॉईडचा आजार
By appasaheb.patil | Published: February 11, 2019 02:37 PM2019-02-11T14:37:35+5:302019-02-11T14:46:57+5:30
सोलापूर : सकस आहाराची कमतरता... धावपळीची जीवनशैली...वाढते वजन... मानसिक ताणतणाव... मासिक पाळीच्या विविध समस्या यासह थायरॉईडच्या आजाराने अनेक महिला ...
सोलापूर : सकस आहाराची कमतरता... धावपळीची जीवनशैली...वाढते वजन... मानसिक ताणतणाव... मासिक पाळीच्या विविध समस्या यासह थायरॉईडच्या आजाराने अनेक महिला ग्रस्त आहेत़ साधारण: एक हजार महिलांमागे किमान २०० महिलांना थायरॉईडचा आजार होतो अशी माहिती प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ़ ललिता पेठकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
थायरॉईडच्या आजाराविषयी बोलताना डॉ़ पेठकर म्हणाल्या की, महिलांची जीवनशैली बदलत चालल्यामुळे थायरॉईडसारखे आजार महिलांमध्ये वाढले आहेत़ साधारणत: वयाच्या तिशीनंतर महिलांमध्ये आढळून येणारा हा आजार सध्या वयाच्या १० ते १४ पासूनच आढळून येत असल्याची धक्कादायक बाब समोर येत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.
थायरॉईड ही मानवी शरीरातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथी आहे. या ग्रंथीचे स्थान गळ्यात विशिष्ट ठिकाणी असते. शरीर किती वेगाने ऊर्जा खर्च करते, शरीरात किती प्रोटिन तयार होतात आणि अन्य हार्मोन्सच्या बाबतीत शरीर किती संवेदनशील आहे, या बाबींवर या ग्रंथीचे नियंत्रण असते. या सगळ्या प्रक्रियेदरम्यान ट्रायओडोथायरॉनाईन (टी-३) आणि थायरॉक्सिन (टी-४) हे दोन प्रकारचे हार्मोन्स तयार होतात. हे हार्मोन्स विशिष्ट शारीरिक प्रक्रियेसाठी आवश्यक असतात.
या आजारांचेही आहेत महिलांवर आक्रमण
साधारणपणे महिलांमध्ये मासिक पाळी, मासिक पाळीच्या तक्रारी, मोलर प्रेग्नन्सी, अंगावरून रक्तस्राव, श्वेतप्रदर (पांढरे पाणी जाणे),ओटीपोटात सूज,गर्भाशयाच्या तोंडाची सूज, जननसंस्थेच्या गाठी व कर्करोग, गर्भाशयाच्या गाठी, बीजांडाच्या गाठी, स्तनांचे आजार, स्त्रीजननसंस्थेची तपासणी, मासिक पाळीच्या समस्या, प्रसूतीपश्चात जंतूसंसर्ग, वंध्यत्व आदी आजारांनी आज अनेक महिला ग्रस्त आहेत.
महिलांचे आरोग्य हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. महिला कायम आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. ती जागरुक होणे हे गरजेचे आहे. आहार, चांगल्या सवयी आणि वैद्यकीय सल्ला या त्रिसूत्रीवर महिलांचे आरोग्य टिकणे आवश्यक आहे. महिलांचे आरोग्य या घटकाला समाजात अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे नाकारून चालणार नाही. या देशातील महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर त्याचा परिणाम निश्चितपणे देशाच्या सर्वागीण विकासासाठी होऊ शकेल.
- डॉ़ ललिता पेठकर, स्त्रीरोग तज्ज्ञ, सोलापूऱ