तीन हजार झाडे अलगद उखडली अन्... नव्या हायवेलगत हळुवारपणे रूजविली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 10:59 AM2019-02-04T10:59:04+5:302019-02-04T11:10:03+5:30
नारायण चव्हाण सोलापूर : सोलापूर - विजयपूर राष्टÑीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सध्या जोमात सुरू आहे. या कामासाठी जेव्हा भूसंपादन ...
नारायण चव्हाण
सोलापूर : सोलापूर - विजयपूर राष्टÑीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सध्या जोमात सुरू आहे. या कामासाठी जेव्हा भूसंपादन करण्यात आले, तेव्हा मुख्य महामार्ग आणि लगतच्या जमिनीवर झाडे तोडल्याशिवाय महामार्गाच्या विकासाचे काम करणे शक्यच नव्हते; पण प्रकल्प संचालक संजय कदम यांना निसर्गात समतोल राखणारी ही वृक्षसंपदा वाचवायची होती. त्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या टीमने महामार्गावरील तीन हजार झाडे अलगद उखडून काढली अन् हळुवारपणे नवीन जागेवर त्यांचे पुनर्रोपण केले.
राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने सोलापूर शहराला जोडणाºया रस्त्यांची कामे सुरू आहेत. सोलापूर-विजयपूर हा १०९ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग त्यापैकी एक आहे. भूसंपादनानंतर केलेल्या सर्वेक्षणात जुन्या मार्गावर अनेक लहान -मोठी झाडे आहेत. ही झाडे वाचविण्यासाठी सामाजिक वनीकरण , वनविभागाच्या अधिकाºयांशी कदम यांनी चर्चा केली, परंतु त्यात फारसे यश येईल का, हाही प्रश्न होताच.
आतापर्यंत वड , पिंपळ अशा दीर्घायुषी झाडांचे पुनर्रोपण केले जात होते. त्यासाठी विशिष्ट अशी यंत्रसामुग्री आवश्यक असते. खर्चही अधिक होतो . मग इतक्या मोठ्या प्रमाणावर ही झाडे अलगदपणे काढून ती अन्यत्र रोपण करणे जिकरीचे काम होते. यासाठी प्राधिकरणाकडे निधीची तरतूद नव्हती. हा प्रकल्प आराखड्याबाहेरचा मग खर्च करायचा तरी कसा, हा प्रश्न होताच .त्यातही त्यांनी मार्ग काढला.
सोलापूर-पुणे महामार्गावरून जंगली हॉटेलपासून निघालेला हा बायपास रोड हत्तूरजवळ विजयपूर महामार्गाला मिळतो . या मार्गावरील चौपदरीकरणाचे काम करताना शक्य तितकी झाडे वाचवण्याचा प्रयत्न कसोशीने करण्यात आला. त्यासाठी ‘आयजेएम’ (इंडिया) या चौपदरीकरणाचे काम घेतलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीची मदत त्यांनी घेतली. लागणारी यंत्रसामुग्री, मनुष्यबळ वापरले. पाण्याच्या टँकरच्या खर्चाची तरतूद केली आणि या झाडांना जीवदान दिले.
असे केले पुनर्रोपण
- रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी दोन्ही बाजूंची झाडे जेसीबीच्या सहाय्याने चोहोबाजूने खड्डा खोदून अलगदपणे उचलण्यात आली. त्यापूर्वी बाजूला सोयीस्कर ठिकाणी झाडासाठी खोल खड्डे खोदून ठेवले होते. त्या खड्ड्यांमध्ये योग्य ती खते टाकली . जेसीबीच्या सहाय्याने उखडलेले ते झाड अलगदपणे नव्या खड्ड्यात लावण्यात आले. त्यामागोमाग पाण्याचा टँकर , मजुरांची टीम यांच्या सहाय्याने झाडांचे रोपण करण्यात येते. जवळपास ३ हजार झाडे वाचवण्याचा हा प्रयत्न आहे.आतापर्यंत बहुतांश झाडांचे यशस्वीपणे रोपण करण्यात आले आहे.
रस्ते बांधणी करताना नेहमीच झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. सिमेंटच्या जंगलामुळे पर्यावरणाचा ºहास होतो. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जंगलतोड टाळली पाहिजे. रस्ते करताना वृक्षारोपण तर करायलाच हवे. जिवंत झाडे तोडण्याऐवजी त्यांचे पुनर्रोपण केल्याने वृक्षराजी टिकते. लावलेली झाडे ७५ टक्के जिवंत राहिली याचेही समाधान आहे.
- संजय कदम,
प्रकल्प संचालक , राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सोलापूऱ
वड ,पिंपळ, कडुनिंबची झाडे
- जेसीबीच्या मदतीने मोठा घेर असणारी झाडे उखडून त्यांचे पुनर्रोपण करणे जिकरीचे असते़ त्यामुळे उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करीत मध्यम आणि कमी घेर असणाºया वड , पिंपळ , कडुनिंब , करंज आणि बाभूळ आदी झाडांचा त्यात समावेश आहे . नांदणीच्या माळरानावर असलेली करंज आणि खैराची झाडेदेखील त्यांच्या फांद्या तोडून रांगेने लावण्यात आली आहेत.जंगलाचा लूक जसाच्या तसा राखण्यात त्यांना यश आले आहे.