बार्शीत दोन दिवस तुटवड्यानंतर हजार लस उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:23 AM2021-04-09T04:23:12+5:302021-04-09T04:23:12+5:30
बार्शीत एकीकडे कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना बुधवारी रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे पेशंटच्या नातेवाइकांची तारांबळ उडाली. दुसरीकडे ...
बार्शीत एकीकडे कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना बुधवारी रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे पेशंटच्या नातेवाइकांची तारांबळ उडाली. दुसरीकडे शासन लसीकरण करा, असे म्हणत आहे अन् दुसऱ्या बाजूला लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने शासकीय लसीकरण केंद्रांवर नागरिकांना लस घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागले. तालुक्यात मागील चार दिवसांत लस संपल्याने तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे कित्येक लोक लसीकरण केंद्रावरून रिकाम्या हाताने परत जात होते. मात्र, तालुक्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रात लस शिल्लक दिसत असल्याने शासनाकडून लस येत नव्हती. तालुक्यातील संपूर्ण साठा संपल्यावर गुरुवारी एक हजार लसीचे डोस आल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.
बार्शी शहर व तालुक्यात चौधरी हॉस्पिटल बार्शी, प्राथमिक आरोग्य केंद्र आगळगाव, वैराग, तडवळे, गौडगाव, पानगाव, उपळे दुमाला, चिखर्डे, ग्रामीण रुग्णालय पांगरी, बार्शी, एनयूएचएम बार्शी, श्रुश्रुत हॉस्पिटल बार्शी, सुविधा हॉस्पिटल बार्शी, भातलवंडे हॉस्पिटल बार्शी, जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी, कॅन्सर हॉस्पिटल बार्शी या १६ ठिकाणी लसीकरणाची सोय आहे. याठिकाणी मागील आठवड्यात दररोज किती डोस दिले जात होते, त्याच्या सरासरीनुसार प्रत्येक केंद्राला लसीचे डोस दररोज दिले जात आहेत.
तालुक्यात आजअखेर २१ हजार ७९२ जणांनी पहिला तर ३ हजार १०७ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. एकूण २४ हजार ८९९ जणांनी लस घेतली आहे.
कोट ::::::
मी लस घेण्यासाठी बार्शीतील एनयूएचएच या केंद्रावर तीन दिवस हेलपाटे मारले. मात्र, लस उपलब्ध नसल्याने परत जावे लागले.
-
विमल इंगोल,
नागरिक