लसीकरणावेळी महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना धमकी; सरपंच पतीविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 02:39 PM2021-05-28T14:39:19+5:302021-05-28T14:39:23+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
कुर्डूवाडी - रोपळे (ता.माढा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड-१९ बाबतचे लसीकरण सुरू असताना गावच्या विद्यमान सरपंच वैशाली गोडगे यांचे पती व गावचे माजी सरपंच तात्यासाहेब गोडगे( रा.रोपळे) हे कुर्डूवाडीत राहत असलेल्या एका ओळखीच्या व्यक्तीला घेऊन आरोग्य केंद्रात आले. यावेळी लसीचे टोकन नंबर न घेता, रांगेतून लस न घेता थेट लसीकरण सुरू आहे तिथे ते आतमध्ये येऊन माझ्या माणसांना लस द्या अन्यथा तुम्ही नाही दिली तर तुमची बदली करून टाकीन, गावात राहू देणार नाही, बेइज्जत करून माझ्या गावातून हाकलून देईन असे उपस्थित असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
दरम्यान, ही घटना २६ एप्रिल रोजी घडली होती. त्यानंतर पुन्हा २७ मे रोजीही सकाळी आरोग्य केंद्रात कर्तव्यावर असताना वैद्यकीय अधिकारी यांना गोडगे यांनी दूरध्वनीद्वारे गावाला लस द्या नाही तर तुम्हाला जिवे मारीन अशी धमकी दिल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. राखी वसंतराव भंडारे (वय ४८,रा सरकारी कॉरटर, रोपळे आरोग्य दवाखाना) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुर्डूवाडी पोलिसांत माजी सरपंच तात्यासाहेब गोडगे (रा.रोपळे) यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे हे करीत आहेत.