पंढरीत कार्तिकीला येणाऱ्या भाविकांसाठी साडेतीन हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त

By विलास जळकोटकर | Published: November 18, 2023 05:13 PM2023-11-18T17:13:44+5:302023-11-18T17:14:21+5:30

पंढरपुरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्याबरोबरच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, खासगी वाहनांद्वारे लाखोंच्या संख्येने पंढरीत भाविकांची गर्दी होते.

Three and a half thousand policemen are well prepared for the devotees coming to Kartiki in Pandhari | पंढरीत कार्तिकीला येणाऱ्या भाविकांसाठी साडेतीन हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त

पंढरीत कार्तिकीला येणाऱ्या भाविकांसाठी साडेतीन हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त

सोलापूर : वर्षातील प्रमुख समजल्या जाणाऱ्या चार प्रमुख वाऱ्यापैकी येत्या २३ नोव्हेंबर रोजी कार्तिक वारी सोहळा होत आहे. राज्यातून वारकऱ्यांच्या दिंड्यासह भक्तगण पंढरपुरात दाखल होतात. या काळात शांतता व सुव्यवस्थेसाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी तब्बल साडेतीन हजार पोलिसांच्या बंदोबस्ताचे नियोजन आखले आहे. यात्रा काळात संशयास्पद हालचाली आढळल्यास लागलीच खबर देण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे. 

जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी वेळापत्र आखले आहे. त्यानुसार पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी फिक्स पाईंटसह मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त असेल, असे सांगण्यात आले.

पंढरपुरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्याबरोबरच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, खासगी वाहनांद्वारे लाखोंच्या संख्येने पंढरीत भाविकांची गर्दी होते. या काळात पंढरपुरात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर येऊन पडते.

यात्रा काळात चंद्रभागा नदी तिरापासून ते मार्गावर व शहरातील विविध ठिकाणी चोख बंदोबस्त असणार आहे. गर्दीचा लाभ उठवून चोऱ्यांचेही प्रमाण वाढू शकते यासाठी पोलिसांचा करडी नजर असणार आहे. नागरिकांनीही कोठे अनुचित प्रकार होताना दिसून आल्यास तातडीने पोलिसांना खबर देऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

असा असणार बंदोबस्त

पोलिस अधीक्षक एक, अपर पोलिस अधीक्षक १, उप अधीक्षक १३, पोलिस निरीक्षक २१, फौजदार व सहा. पोलिस उपनिरीक्षक ११७, पोलिस अंमलदार २०००, होमगार्ड १२००, एक राज्य राखीव पोलिस दल तुकडी असा एकूण ३ हजार ५०० पोलिसांचा ताफा बंदोबस्तासाठी असणार आहे.

Web Title: Three and a half thousand policemen are well prepared for the devotees coming to Kartiki in Pandhari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.