१२५ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा अन् बंदोबस्तासाठी साडेतीन हजार पोलीस
By Appasaheb.patil | Published: November 1, 2022 05:06 PM2022-11-01T17:06:29+5:302022-11-01T17:06:38+5:30
पंढरपुरातील कार्तिक यात्रा; होमगार्ड, एसआरपीएफची तुकडीसह सहा वॉच टॉवर
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : कार्तिक यात्रेत वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांची यंत्रणा सज्ज झाली आहे. वारीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात १२५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, बंदोबस्तासाठी साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
कार्तिक शुद्ध एकादशी दि. ४ नोव्हेंबर २०२२ रोजी असून, या कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात. वारीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षित व निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. कार्तिक वारी कालावधीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून, सुरक्षेसाठी व वाहतूक नियंत्रणासाठी तीन हजार ५२४ पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच होमगार्ड यांची नेमणूक करण्यात आली आहे.
--------
असा आहे पोलिसांचा बंदोबस्त
- पोलीस अधीक्षक - ०१
- अपर पोलीस अधीक्षक - ०१
- पोलीस उपअधीक्षक - १२
- पोलीस निरीक्षक - २६
- सहायक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक-१८७
- पोलीस कर्मचारी-२ हजार ०३१
- होमगार्ड - २६८
- एसआरपीएफ कंपनी तुकडी - ०१
---------
सहा ठिकाणी वॉच टॉवर अन् बीडीडीएस पथक
कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर सहा वॉच टॉवर उभारले असून, ४ बीडीडीएस पथके मंदिर परिसरात तैनात असणार आहेत. वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नदीपात्र, ६५ एकर, महाद्वार चौक, पत्राशेड, चंद्रभागा घाट, छत्रपती शिवाजी चौक या सहा ठिकाणी वॉच टॉवर करण्यात आले आहेत.
---------
१५ ठिकाणी वाहनतळांची निर्मिती
वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये भाविकांना वाहतुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जड वाहतूक शहराबाहेरून वळविण्यात आली आहे. तसेच वाहतूक नियमनासाठी १२ ठिकाणी डायव्हरशन पॉइंट सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर खासगी वाहनधारकांच्या वाहनांना थांबविण्यासाठी १५ ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली असून, या वाहनतळांवर सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक वाहने पार्क करण्याची क्षमता असल्याचेही उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.
--------
नदीपात्रासह महाद्वार चौक, नगर प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर, ६५ एकर आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे मंदिर समितीच्या वतीने बसविण्यात येणार आहेत. भाविकांनी तसेच नागरिकांनी सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.
- शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण