४० दिवसांत ३,६०,००० रुपयांचं उत्पन्न; सोलापूरच्या शेतकऱ्यानं 'असा' केला चमत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 10:59 AM2020-02-28T10:59:15+5:302020-02-28T12:47:08+5:30
कमी कालावधी, कमी क्षेत्रात कलिंगडामधून घेतले जास्त उत्पन्न; एक एकर पाच गुंठ्यात ४० टन उत्पादन अन् तीन लाख ६० हजार रुपये कमविले.
प्रभू पुजारी
सोलापूर : घरची परिस्थिती बऱ्यापैकी. पण शेती करण्याची आवड... इतकेच नव्हे तर शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी क्षेत्रात, कमी कालावधीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल, यासाठी प्रयत्न सुरू असतो. त्यातून ही किमया साधली आहे कोरवली (ता. मोहोळ) येथील शेतकरी रेवणसिद्ध गुरुसिद्ध कोरे यांनी त्यांनी केवळ एक एकर पाच गुंठे क्षेत्रात कलिंगडामधून तब्बल ३ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
शेतजमीन मध्यम स्वरुपाची असली तरी त्याला पाणी अन् कष्टाची जोड असली की त्यातूनही सोने पिकते, असे म्हटले जाते. ही उक्ती रेवणसिद्ध कोरे यांनी तंतोतंत आचरणात आणली आहे. कोरवली येथे त्यांची केवळ सहा एकर शेतजमीन आहे. याच क्षेत्रावर त्यांनी अनेक पिकांचे वेगवेगळे प्रयोग केले आणि ते यशस्वीही झाले आहेत.
यावर्षी दोन महिन्यापूर्वी शेतीची मशागत करून एकरी दोन ट्रॉली म्हणजेच २० टन शेणखत टाकले. त्यानंतर ६ फूट अंतराचे बेड तयार केले. त्यावर मल्चिंग पेपर अंथरुण ठिबक सिंचन केले़ त्यानंतर दीड फूट अंतरावर एक कलिंगडाचे रोप याप्रमाणे ६ हजार रोपांची लागवड केली. ८ ते १० दिवसांच्या अंतराने खतांची मात्रा, योग्य वेळी पाणी आणि रासायनिक खते व औषधांची मात्रा दिली. त्यामुळे केवळ दोन महिन्यातच कलिंगड बाजारात विक्रीसाठी आले.
त्यानंतर त्यांनी स्थानिक बाजारपेठ निवडण्याऐवजी थेट गुजरातच्या बाजारापेठेत कलिंगड विक्रीसाठी पाठविले. त्या ठिकाणी विक्रीसाठी जाण्यास खर्च जास्त होत असला तरी जास्त दर मिळत आहे. शिवाय हे कलिंगड गुजरातमधील नागरिक चवीने खातात.
यासाठी आनंद शिंदे, जाकीर शेख, मुजावर शेख यांचे मार्गदर्शन लाभले. योग्य नियोजन आणि मार्गदर्शनामुळे यावर्षी विक्रमी उत्पादन घेण्यात यश आले. कलिंगड हे कमी कालावधीत जास्त उत्पादन मिळवून देणारे पीक आहे. ते घेण्यात यशस्वी झाल्याचे रेवणसिद्ध कोरे यांनी सांगितले.
मुलगा अमेरिकेत शास्त्रज्ञ
- रेवणसिद्ध कोरे सांगत होते, दोन मुले आणि एक मुलगी आहे़ एक मुलगा अमेरिकेत शास्त्रज्ञ तर एक शिक्षक आहे़ मुलगीही उच्चशिक्षित आहे़ शेतकरी असूनही मुलांना शिक्षण घेताना कशाचीही कमतरता पडू दिली नाही़ यासाठी अपार कष्ट घेतले. मुलांनीही माझ्या कष्टाची जाणीव ठेवत उच्च शिक्षण घेत नोकरी करीत आहेत, यापेक्षा दुसरा आनंद नाही, असे त्यांनी सांगितले.
अनेक जण मुले नोकरीला असले की निवांत राहणे पसंत करतात़ माझीही मुले नोकरीला आहेत, पण मला पूर्वीपासूनच शेतीत कष्ट करण्याची सवय आहे़ शिवाय शेतात नवनवीन प्रयोग करण्याची आवड आहे़ त्यातून हे शक्य झाले़
- रेवणसिद्ध कोरे,
कलिंगड उत्पादक शेतकरी, कोरवली