एकाच दिवसात तब्बल साडेतीन हजार जणांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:22 AM2021-05-08T04:22:54+5:302021-05-08T04:22:54+5:30
गत चार महिन्यांपासून तालुक्यात लसीकरणाला सुरुवात झाली, मात्र त्यास म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने ...
गत चार महिन्यांपासून तालुक्यात लसीकरणाला सुरुवात झाली, मात्र त्यास म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने तेव्हा लस घेतलेल्यांना ही लस कवच कुंडल असल्याची चर्चा सुरू झाली. शिवाय लस घेतलेल्या व्यक्तींना कोरोना होत नाही, जरी झाले तरी त्याचा मृत्यू होत नाही, अशी चर्चा एकमेकांमध्ये होऊ लागली. त्यामुळे तालुक्यातील सर्वच केंद्रांवर लस घेण्यासाठी गर्दी वाढू लागली.
अनेक वेळा लस संपल्याने नागरिकांना रांगेतून परत जावे लागले आहे. मात्र आता नागरिकांना लसीचे महत्त्व समजू लागले, त्यामुळे लसीकरणासाठी गर्दी वाढत आहे. रांगेतून येणाऱ्यांना वेळीच लस मिळावी, यासाठी प्रशासनाकडून योग्य पद्धतीने नियोजन होणे आवश्यक आहे. गर्दीमुळे संसर्ग पसरण्याचा धोका आहे. सर्वच ठिकाणी रांगेमध्ये घुसून व काही ठिकाणी थेट केंद्रात जाऊन एकमेकांच्या वशिल्याने लस घेतल्याच्या तक्रारी होत्या. तालुक्यात आतापर्यंत तब्बल २२ हजार ८१२ नागरिकांनी लस घेतली आहे.
सेंटरनिहाय लसीकरण
अक्कलकोट केंद्रावर जुने तहसीलदार कार्यालय, सेंट्रल चौक, ग्रामीण रुग्णालय एकूण ६४१, मैंदर्गी, हत्तीकणबस ४२९, चप्पळगाव, हन्नूर, चुंगी ६३८, जेऊर, उडगी, अक्कलकोट स्टेशन, कर्जाळ ६३५, नागणसूर, हैद्रा ८०, करजगी, तडवळ, सुलेजवळगे २८८, शिरवळ, सांगवी, सलगर ३८९, वागदरी, बोरगाव, काझीकणबस ३६४, दुधनी १३४ असे या सर्व केंद्रावर मिळून एकाच दिवशी ३ हजार ५९७ जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.
कोट :::::
१८ ते ४४ वयोगटासाठी तालुक्यात १ हजार लस आल्या असून केवळ याच गटातील लोकांना देण्यात येणार आहे. रोज २०० लस देण्यात येतील. पाच दिवस मोहीम चालणार आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी त्याचे आपआपल्या मोबाइलवर मेसेज घेऊन येणे सक्तीचे आहे.
- डॉ. अश्विन करजखेडे,
तालुका आरोग्य अधिकारी