सीताफळाचे बियाणे चोरणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:22 AM2021-04-21T04:22:35+5:302021-04-21T04:22:35+5:30
बार्शी : गोरमळे येथील शेतकऱ्यांनी सीताफळाची रोपे तयार करण्यासाठी आणून ठेवलेले ३२ हजारांचे बियाणे चोरून ...
बार्शी : गोरमळे येथील शेतकऱ्यांनी सीताफळाची रोपे तयार करण्यासाठी आणून ठेवलेले ३२ हजारांचे बियाणे चोरून नेल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. याप्रकरणी पांगरी पोलिसांनी सहा दिवसात तपास करुन तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन मोटारसायकली आणि १ लाख २२ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
सागर आनंद खळतकर (३१), सागर संजय झोरी (२६), हनुमंत साधू शिंदे (२७, सर्व रा. गोरमाळे, ता. बार्शी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या आरोपींना न्यायालयात हजर करताच तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या कोठडीत तपास करताच त्यांनी ३२ हजार रुपयांचे १६० किलो बियाणे काढून दिले.
१५ एप्रिल रोजी गोरमळे येथे नितीन रामेशवर गिराम यांच्या शेतातून रोपे तयार करण्यासाठी प्रत्येकी ४० किलो वजनाचे चार कट्टे खोलीत ठेवले होते. रात्री जेवण करण्यासाठी गावात घरी गेले होते. जेवण आटोपून परत आल्यानंतर घराला कुलूप दिसले नाही. संशय आल्याने पाहणी करताच बियाणाचे कट्टे दिसले नाहीत. याबाबत त्यांनी पांगरी पोलिसात १६ एप्रिल रोजी फिर्याद दिली होती. पोलीस निरीक्षक सुधीर तोडरमल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक परबत, पोलीस नाईक मनोज जाधव, पांडुरंग मुंढे, विनोद बांगर, सुनील बोदमवाड, उमेश कोळी व दिगंबर भांडरवड यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला.
---
सहा दिवसांत लावला छडा
या तपासात संशयितांची पोलिसांना माहिती मिळाली. त्यावरून त्यांचा शोध सुरू घाला. संशयितांना पोलिसांनी सापळा लावून ताब्यात घेतले. केवळ सहा दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला.
---
२० पांगरी
गोरमाळेतून पळविलेल्या सीताफळाच्या बियाणासह आरोपींना पांगरी पोलिसांनी ताब्यात घेतले.