यात्रेत हरविलेल्या १२७ मुले पोलिसांनी केली पालकांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 12:29 PM2020-01-20T12:29:44+5:302020-01-20T12:33:39+5:30
सोलापूरची सिध्देश्वर यात्रा; नागरिकांच्या मदतीने पालकांना देण्यात पोलिसांना यश
संताजी शिंदे
सोलापूर : अनेक हिंदी सिनेमांच्या कथानकांमध्ये यात्रेत मुलं हरविल्याचे प्रसंग पाहायला मिळतात. सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेत असा सिनेमाप्रमाणे मुलांच्या ‘बिछडण्या’चा प्रसंग घडूच नये, यासाठी यंदा पोलिसांनी विशेष काळजी घेतली आहे. यासाठी पोलिसांनी यात्रेकरूंचंच प्रबोधन केलं आहे. त्यामुळे जत्रेत एकटं फिरणारं, रडणारं मुल आढळून आल्यास यात्रेकरून ते चौकीपर्यंत पोहोचविलं जातं. तेथे या मुलांची विशेष काळजी घेऊन लाऊड स्पिकरवरून सततची उद्घोषणा केली जाते...पालक आपल्या हरविलेल्या मुलाचं वर्णन ऐकून थेट यात्रेतील पोलीस चौकी गाठतात अन् थोडीबहुत चौकशी करून पोलिस त्या मुलांना पालकांच्या स्वाधीन करतात...गेल्या आठवड्याभराच्या काळात येथील यात्रेत हरविलेली १२७ मुलं पालकांच्या स्वाधीन करण्यात आली आहेत.
आठ दिवसांच्या कालावधीत हातातून निसटलेली, रस्ता चुकून दुसरीकडे गेलेली ५ ते १२ वयोगटातील १२७ मुले आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आली आहेत. यात्रेकरू श्री सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी येतात. तेथून होम मैदानावर भरलेल्या यात्रेत जातात.तेथे खरेदीमध्ये रमून जातात. याचवेळी गर्दीमध्ये लहान मुलांचा हात सुटतो किंवा मुले चुकून आई-वडिलांच्या पाठीमागे जाण्याचा रस्ता चुकतात. आपण चुकलो हे लक्षात आल्यानंतर रडणाºया या मुलांना दुकानदार किंवा यात्रेकरू होम मैदान येथील पोलीस चौकी आणि सिद्धेश्वर प्रशालेत असलेल्या कंट्रोल रूममध्ये, मंदिरातील कंट्रोल रूममध्ये आणून सोडतात. मुलगा किंवा मुलगी आल्यास पोलीस कर्मचारी तत्काळ स्पिकरवरून अनाउन्समेंट करतात.
मुलाचे किंवा मुलीचे नाव समजल्यास त्याच्या नावानिशी उद्घोषणा केली जाते. आपल्या मुलाचे नाव ऐकताच आई-वडील धावत पोलिसांच्या कंट्रोल रूमकडे येतात. पोलीस मुलांना त्यांच्या आई-वडिलांकडे सोपवतात. आजतागायत आठ दिवसांमध्ये १२७ मुले व मुली आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आल्या आहेत.
जागोजागी डिजिटल बोर्ड...
- यात्रेत लोकांना पोलीस चौकी लक्षात यावी यासाठी जागोजागी दिशादर्शक डिजिटल बोर्ड लावण्यात आले आहेत. मदत केंद्र, पोलीस चौक, चौकीचा मार्ग असे फलक लावल्याने यात्रेतील लोकांना पोलीस चौकीकडे जाणे सहजशक्य होत आहे. मंदिर परिसर, श्री सिद्धेश्वर प्रशाला आणि होम मैदान या तिन्ही ठिकाणाहून यात्रेतील लोकांना अनाउन्स करून सूचना दिल्या जात आहेत. मंगळसूत्र चोर, मोबाईल चोर आणि पाकीटमारपासून सावध राहण्याच्या सूचना वारंवार केल्या जात आहेत. ही सूचना मराठी आणि कन्नडमधून दिली जात आहे. जागोजागी अडचणीच्या वेळी संपर्क करण्याचे फोन नंबरही लावले आहेत.
भाविकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना यात्रा सुरक्षित व्हावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. नागरिकांनी कोणत्याही गोष्टीचा संशय आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. यात्रेत सतर्क राहावे आणि पोलिसांना सहकार्य करावे.
- अभय डोंगरे
सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे)
सीसीटीव्हीची नजर...
- यात्रेतील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याचे कंट्रोलही होम मैदान येथील चौक, श्री सिद्धेश्वर प्रशाला आणि मंदिर परिसरात ठेवण्यात आले आहे. यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त केले आहेत.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
- भाविकांच्या सुरक्षेसाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने फौजदार चावडी पोलीस ठाणे, सदर बझार पोलीस ठाणे येथील पोलीस कर्मचारी, डीबीचे पथक आणि गुन्हे शाखेचे पथक दिवस-रात्र तैनात करण्यात आले आहेत. एसआरपीएफच्या दोन तुकड्या या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. छेडछाडसारख्या प्रकाराला आळा घालण्यासाठी दामिनी पथकाच्या १0 महिला कर्मचारी सातत्याने यात्रेत फिरत आहेत. साध्या वेशात गुन्हे शाखेचे पोलीस गस्त घालत असतात. मार्केट पोलीस चौकी ते हरिभाई देवकरण प्रशालेकडे जाणाºया आपत्कालीन मार्गावर कायम पोलिसांची पेट्रोलिंग होत आहे.