coronavirus; सोलापूर जिल्ह्यातील ७५ न्यायालयाचे कामकाज चालणार तीन तास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 04:30 PM2020-03-17T16:30:45+5:302020-03-17T16:34:28+5:30
मुंबई उच्च न्यायालयाकडून सूचना; कोरोना व्हायरसमुळे न्यायालयातील गर्दी टाळण्याच्या सूचना
सोलापूर : कोरोना व्हायरसमुळे न्यायालयाचे कामकाज तीन तास तर कार्यालयीन कामकाज चार तास चालवण्यात यावे अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिल्या आहे. त्यानुसार सोलापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्यावतीने त्याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारपासून राज्यातील सर्व न्यायालये ३ ते ४ तास या वेळेत चालवण्याच्या सूचना केल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनेवरून १७ मार्चपासून सकाळी ११ ते २ या वेळेत न्यायालयीन कामकाज चालणार आहे. दरम्यान न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी, पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी, साक्षीदारांचे न्यायालयाकडुन नोंदविले जाणारे जवाब (सीआरपीसी १६४), तत्काळ मनाई हुकूमाचे आदेश, स्थगिती आदेश इत्यादी कामकाज होणार आहे.
कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी न्यायालयाने परिसरात अनावश्यक गर्दी टाळण्याच्याही सुचना केल्या आहेत. एका ठिकाणी गर्दी करून उभे राहू नये, एक मेकांना स्पर्श करून नये असा सल्लाही दिला आहे. न्यायालयाच्या परिसरातील कॅन्टीन, बाररूम हे ११ ते २ नंतर बंद करण्याच्या सुचना दिल्या आहेत. न्यायालयाचे कामकाज हे तीन तासाचे असले तर न्यायालयातील कार्यालयीन कामकाजाचे तास सकाळी १0.३0 ते २.३0 असे ठेवण्यात आले आहे. यामध्ये फक्त ५0 टक्के कर्मचारी आदलुन बदलून काम करणार आहेत. एके दिवशी ५0 टक्के कर्मचारी काम करतील तर दुसºया दिवशी ५0 टक्के कर्मचारी कामावर येतील. यामुळे न्यायालयातील कर्मचाºयांना एक दिवसाआड सुट्टी मिळणार आहे.
जिल्ह्यात एकूण ७५ न्यायालये...
- सोलापूर जिल्ह्यात एकूण शहर व विविध तालुक्यात एकूण ७५ न्यायालये आहेत. शहरातील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात विविध असे एकूण २९ न्यायालय आहेत. अन्य ठिकाणी कौटुंबीक न्यायालय, ग्राहकमंच आदी ६ न्यायालये आहेत. शहरात एकूण ३५ न्यायालये आहेत. जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ, करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, अक्कलकोट या ठिकाणी सर्व मिळून ४0 न्यायालये आहेत. सर्व न्यायालये पुढील सूचन येई पर्यंत ३ ते ४ तास या वेळेत चालणार आहेत.