सोलापूर जिल्ह्यातील तीन लाख वीज ग्राहकांकडे ४६ कोटींची थकबाकी
By appasaheb.patil | Published: August 24, 2019 10:30 AM2019-08-24T10:30:51+5:302019-08-24T10:33:04+5:30
महावितरण : वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील २ लाख ८७ हजार ६५० वीज ग्राहकांकडे ४६ कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी आहे़ थकबाकीचा वाढता आलेख पाहता महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु करण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
महावितरणकडून सेंट्रलाईज बिलिंग सिस्टीमची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर मीटर रीडिंगचे वाचन दरमहा ठराविक दिवशी व वीज ग्राहकांना एसएमएसद्वारे पूर्वमाहिती देऊन केले जात आहे. तसेच वीज बिलांची रक्कम, वापरलेले युनिट, वीजबिल भरण्याची मुदत आदींची माहिती ग्राहकांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठविली जात आहे. सोबत छापील वीजबिलसुद्धा वेळेत पाठविण्यात येत आहे.
याशिवाय एसएमएसद्वारे वीजबिल भरणा करण्यासाठी स्मरण देणारा संदेश पाठविला जात आहे. त्यामुळे बिलिंगमधील तक्रारींचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत अतिशय कमी झाले आहे. वीजबिल भरण्याची मुदत उलटून गेल्यानंतर नियमाप्रमाणे नोटीसदेखील एसएमएसद्वारे दिली जात आहे.
वीजबिल भरण्यासाठी महावितरणचे संकेतस्थळ, मोबाईल अॅपद्वारे घरबसल्या सोय आहे. सद्यस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील २ लाख ८७ हजार ६५० वीज ग्राहकांकडे ४६ कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी महावितरणकडून आता नियमाप्रमाणे कारवाई सुरु करण्यात आली आहे.
डिजिटल पेमेंटचा लाभ घ्या...
- चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबिल भरणा केंद्र, ई-वॉलेटची सोय उपलब्ध आहे. तसेच चालू व थकीत वीजबिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटचा तसेच मोबाईल अॅपद्वारे आॅनलाईन सोय उपलब्ध आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी संपूर्ण थकीत रकमेचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
असा आहे मंडलनिहाय थकबाकीचा आलेख
विभाग ग्राहक थकबाकी
अकलूज विभाग २७ हजार ३५५ ३ कोटी ६२ लाख
बार्शी विभाग ६१ हजार २४५ ९ कोटी ७६ लाख
पंढरपूर विभाग ६५ हजार ३५५ ९ कोटी ८१ लाख
सोलापूर शहर विभाग ६३ हजार २७५ ११ कोटी ६२ लाख
सोलापूर ग्रामीण विभाग ७० हजार ४१५ ११ कोटी ३६ लाख
सोलापूर जिल्ह्यातील २ लाख ८७ हजार ६५० वीज ग्राहकांकडे ४६ कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी आहे़ वारंवार आवाहन करून तसेच नोटीस पाठवूनदेखील थकबाकी भरली जात नसल्याने नियमाप्रमाणे थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. वीज ग्राहकांनी वीजबिल भरून महावितरणकडून होणारी कारवाई टाळावी़
- ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, सोलापूर मंडल़