माघ वारीत गरिबाच्या पांडुरंगाला तीन कोटींचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 10:53 AM2020-02-12T10:53:15+5:302020-02-12T10:54:51+5:30
पंढरपूर : महाराष्ट्रासह देशभरातील भाविक पंढरपूरच्या विठ्ठल चरणी
पंढरपूर: गरिबांचा देव म्हणून ओळखल्या जाणाºया पंढरपूरच्या पांडुरंगाला यंदाच्या माघ वारीमध्ये तब्बल २ कोटी ९० लाख २६ हजार ५७९ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीपेक्षा या उत्पन्नामध्ये १ कोटी ३१ लाखांनी वाढ झाली आहे. गतवर्षी माघ वारीच्या काळामध्ये १ कोटी ५८ लाख ५७ हजार ८९१ रुपयांचे उत्पन्न मंदिर समितीला प्राप्त झाले होते.
पांडुरंगाच्या अर्थात श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी महाराष्टÑच काय देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. अलीकडे तर परदेशातूनही भाविक आकर्षित होऊ लागले आहेत. यंदाच्या माघ वारी यात्रेच्या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांनी मंदिर समितीला सढळ हाताने मदत केल्याचे दिसून आले. यामुळे मंदिर समितीला गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी १ कोटी ३१ लाख ६८ हजार ६८८ रुपयांनी वाढ झाली आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीमार्फत माघी यात्रा २०२० मध्ये माघ शु. १ ते माघ शु. १५ या कालावधीत भाविकांची दर्शन व्यवस्था चांगल्या प्रकारे होण्यासाठी योग्य नियोजन केले होते. या कालावधीत भाविकांकडून प्राप्त होणाºया निरनिराळ्या देणगी रकमा व अन्य मार्गाने समितीस एकूण २ कोटी ९० लाख २६ हजार ५७९ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
या देणगी उत्पन्नामध्ये श्री विठ्ठलाच्या पायावर १९ लाख २२ हजार २०७ रुपये, श्री रुक्मिणी मातेच्या पायावर ५ लाख ५८ हजार ३०२ रुपये, अन्नछत्र देणगी २ लाख ११ हजार ४७६, पावती स्वरुपातील देणगी ५० लाख ७२५ रुपये, बुंदी लाडू प्रसाद विक्री ३५ लाख ९९ हजार १३० रुपये, राजगिरा लाडू विक्री ३ लाख ५८ हजार रुपये, फोटो विक्री ६६ हजार १२५ रुपये, भक्तनिवास, वेदांता, व्हिडिओकॉन, श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास २२ लाख २८ हजार ४८० रुपये, नित्यपूजा १ लाख ३६ हजार रुपये, हुंडी पेटीमध्ये जमा ७४ लाख ७४ हजार ८०९ रुपये, परिवार देवता १४ लाख ९६ हजार १७४ रुपये, आॅनलाईन देणगी १७ लाख ३१ हजार ३२२ रुपये व अन्य स्वरूपात ४२ लाख ४३ हजार ८२९ रुपयांचा समावेश आहे. गतवर्षी याच कालावधीमध्ये १ कोटी ५८ लाख ५७ हजार ८९१ रुपयांचे उत्पन्न मंदिर समितीला प्राप्त झाले होते.
मंदिर समितीला १५०० डॉलरचे दान
- - अमेरिकेत स्थायिक असलेल्या एका दाम्पत्याने पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेतले असून, मंदिर समितीला १५०० डॉलर दान केले तर स्वदेशातील एका उद्योजकाने हेलिकॉप्टरने प्रवास करून पांडुरंगाचे दर्शन घेतले आहे.
- - रामचंद्रराव आर. वेमुलापल्ली व जांसी रामचंद्रराव वेमुलापल्ली (रा. लॉन को हिल्स वेलिंग्स्टन, अमेरिका) हे दाम्पत्य श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंगळवारी पंढरपुरात आले होते. त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला १५०० डॉलर दान केले. या डॉलरचे भारतीय चलनाप्रमाणे एक लाख सहा हजार रुपये होतात. मंदिर समितीच्या वतीने विठ्ठुरायाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार केला.
- - पुणे येथील उद्योजक सुधीर मांडके यांच्यासह पत्नी माधुरी मांडके, मुलगा इंद्रदील आणि नताशा मांडके यांनी विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी मंदिर समितीच्या उत्पन्नात १ कोटी ३१ लाख ६८ हजार ६८८ रुपयांची वाढ झाली आहे. भाविकांचे पांडुरंगावर अर्थात विठ्ठलावर असलेल्या निस्सीम भक्तीचे हे द्योतक म्हणावे लागेल.
- विठ्ठल जोशी
मंदिर समिती कार्यकारी अधिकारी