जन्मदाखल्यात खाडाखोड करणारे सोलापूर महापालिकेतील तीन कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 02:38 PM2018-06-22T14:38:42+5:302018-06-22T14:38:42+5:30
मनपा आयुक्त अविनाश ढाकणे यांची कारवाई, माजी उपमहापौराने केली होती तक्रार
सोलापूर : नोंदवहीत खाडाखोड केल्याचे दिसून येत असतानाही संगणकीय व हस्तलिखित दाखल्यात वेगवेगळ्या तारखा दिल्याप्रकरणी महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंद विभागातील तीन कर्मचाºयांना आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी बुधवारी सायंकाळी तडकाफडकी निलंबित केले आहे.
आरोग्य निरीक्षक तथा उपनिबंधक महादेव शेरखाने, अभिलेख विभागाचे वरिष्ठ मुख्य लेखनिक सुहास उंडाळे, कनिष्ठ लिपिक अप्पाराव गोरे अशी निलंबित करण्यात आलेल्या तीन कर्मचाºयांची नावे आहेत. याबाबत माजी उपमहापौर हारून सय्यद यांनी तक्रार केली आहे. तौसिफ इक्बाल शेख यांची मुलगी सानियाचा जन्म १ जुलै २00३ रोजीचा आहे.
महापालिकेत तिच्या जन्माची ८ जुलै २00३ रोजी नोंद (क्र. २८९७) झाली. याबाबत आलेल्या अर्जावरून १ जानेवारी २0१८ रोजी सानियाचा संगणकीय जन्मदाखला या विभागाकडून देण्यात आला. पण या आधी १ मार्च २0१७ रोजी तिच्याच नावाने देण्यात आलेल्या हस्तलिखित दाखल्याच्या नोंदीत फरक असल्याचे दिसून आले. यावरून सानियाच्या जन्मनोंदीचा दुरुपयोग करण्यासाठी जन्म-मृत्यू विभागातील कर्मचाºयांनी संगनमत केल्याची तक्रार सय्यद यांनी केली आहे. या प्रकरणाबाबत न्यायालयातही दाद मागण्यात आली आहे.
त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत आयुक्त डॉ. ढाकणे यांनी जन्म-मृत्यू दाखला देण्याची संगणकीय पद्धत उपलब्ध असताना चुकीच्या पद्धतीने हस्तलिखित दाखला देऊन गैरवर्तन केल्याप्रकरणी वरील तिघांना तडकाफडकी निलंबित केले आहे. जन्म-मृत्यू कार्यालयातील लिपिक गोरे यांच्याकडे आलेल्या अर्जावरून मूळ रेकॉर्डची तपासणी करून जन्म-मृत्यूचे दाखले तयार करण्याची जबाबदारी आहे.
गोरे यांनी तयार केलेल्या दाखल्याची उपलब्ध कागदपत्रांची तपासणी करून हा दाखला सहीसाठी उपनिबंधक शेरखाने यांच्याकडे पाठविण्याची जबाबदारी उंडाळे यांच्यावर आहे. कागदपत्रांची तपासणी झाली आहे, याची खातरजमा करून संबंधित दाखल्यावर सही करून वितरित करण्याची जबाबदारी शेरखाने यांच्यावर आहे. तसेच सन २00३ च्या जन्माची संगणकावर नोंद उपलब्ध आहे. असे असताना नोंदवहीत सानिया हिच्या नावापुढे खाडाखोड करण्यात आल्याचे निदर्शनाला आल्यावर दाखला वितरित न करता याची वरिष्ठांना कल्पना देण्याची जबाबदारी शेरखाने यांची होती. पण या प्रकरणात या तिघांनीही जबाबदाºया न पार पाडल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
नावातील साम्यावरून चर्चा
- जन्मदाखल्याची तक्रार तौसिफ शेख यांच्या नावासंबंधाने आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर हारून सय्यद यांनी तक्रार केल्याने एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांच्या नावाने चर्चा सुरू झाली. या दोघांनी एकाच प्रभागातून निवडणूक लढविली होती. या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नसल्याचे तौफिक शेख यांनी स्पष्ट केले आहे. एकाच जन्माचे दोन वेगवेगळे दाखले महापालिकेकडून दिले गेल्याने बदनामी होणार असल्याने आयुक्तांकडून गंभीर दखल घेण्यात आली.