चांद्रयान मोहिमेत सोलापुरातील तिघांनी पाडली छाप; कुणी बनविले सेमीकंडक्टर, कुणी पुरविल्या कॉपर ट्यूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2023 06:09 PM2023-08-24T18:09:31+5:302023-08-24T18:09:44+5:30
चांद्रयान - 3 मोहिमेमुळे भारताची मान जगभरात उंचावली आहे.
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : चांद्रयान - 3 मोहिमेमुळे भारताची मान जगभरात उंचावली आहे. या मोहिमेत सोलापूर जिल्ह्यातील एक नव्हे तर तीघांनी आपल्या कामाची छाप पाडली आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी ही एक अभिमानाची बाब असून तरुणांना अभियांत्रिकी व खलोगशास्त्रात करिअर करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणार आहे. चांद्रयान मोहिमेत चीप डिझाईन हा एक महत्वाचा भाग आहे. या चीप डिझाईनच्या टिमला सोलापुरातील तरुण उदय खांबेटे यांच्या टिमने लीड केले. त्यांच्या टिमने एससीएल फॅब्रिकेटेड विक्रम प्रोसेसर याच्या लाँच वेहिकल नेवीगेशन व कॅमेरा कॉनफीगरेटरचे काम केले आहे. यामुळे विक्रम लँडर इमेज कॅमेरा त्याचे काम चांगल्या पद्धतीने करु शकत आहे. उदय खांबेटे यांचे शालेय शिक्षण हे शहरातील हरीभाई देवकरण विद्यालयातून तर पदवीचे शिक्षण वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून झाले.
आयआयटीमधून शिक्षण झाल्यानंतर मल्लिकार्जुन पाटील हे इस्त्रोच्या सेवेत रुजू झाले. इस्रोमध्ये त्यांच्या सेवेचे हे 32 वे वर्ष आहे. सध्या इस्रोच्या केरळमधील विक्रम साराभाई स्पेस सेंटर तिरुअनंतपुरम येथे शास्त्रज्ञ, तसेच सह संचालक या पदावर काम करीत आहेत. इस्रोमध्ये इंजिनीयर म्हणून सुरु झालेला प्रवास सह संचालक पदापर्यंत सुरुच आहे. चांद्रयान मोहिमेत सिल्वर व कॉपरपासून तयार करण्यात आलेल्या ट्यूबचा वापर करण्यात आला आहे. ही ट्यूब सोलापूर जिल्ह्यातील शेखर भोसले यांच्या टीमने तयार केली आहे. भोसले हे मेकॅनिकल इंजिनिअर असून बुलढाणा येथील खामगावमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनविण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. चांद्रयान मोहिमेत त्यांनी 50 ट्यूब तयार करुन इस्त्रोला दिल्या आहेत.