नोकरीचे आमिष दाखवून फसवणाऱ्या शिक्षकासह तिघांना तीन वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:21 AM2021-04-06T04:21:34+5:302021-04-06T04:21:34+5:30
बाळू पासले यांच्या फिर्यादीवरून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी २०१७ मध्ये माढा पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास ...
बाळू पासले यांच्या फिर्यादीवरून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी २०१७ मध्ये माढा पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहा. पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी केला.
या खटल्याच्या तपासादरम्यान तपासलेले साक्षीदार व पुरावे पाहता यातील आरोपी सुधीर जनार्दन माने, रा. आष्टी, ता. मोहोळ, जहांगीर चाँद तांबोळी, रा. सन्मतीनगर माढा व ज्ञानेश्वर श्रीरंग बाबर, रा. मिरे, ता. माळशिरस या तिघांना प्रत्येकी तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणातील फसवणूक झालेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना काही प्रमाणात नुकसानभरपाई देण्याचे आदेश
न्यायालयाने दिल्याने फसवणूक झालेल्या तरुणांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात १७ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली होती. आरोपींनी साक्षीदारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना त्यासाठी पैसे देण्यास प्रवृत्त केले. ही घटना साखळी पद्धतीने पूर्ण केल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला. यावेळी सरकारी वकील विशाल सक्री यांनी या प्रकरणातील आरोपी हे शिक्षित आहेत, त्यांना आपण काय करीत आहोत हे सगळे माहीत होते. त्यांना शिक्षा झाल्यास समाजात चांगला संदेश जाईल, असा युक्तिवाद केला होता.
या खटल्यात ॲड. पी. जे कुलकर्णी, ॲड. एन. डी. भादुले व ॲड. व्ही. पी. सक्री या तिघांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.