कोरोनाबाधित शिक्षकाच्या मृत्यूनंतर कुटुंबातील तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:23 AM2021-05-08T04:23:05+5:302021-05-08T04:23:05+5:30
माने कुटुंबातील आई, वडील, मुलगा व मावशी असा चौघांचा सलग चार दिवसांत मृत्यू झाल्याने घेरडी परिसरात हळहळ ...
माने कुटुंबातील आई, वडील, मुलगा व मावशी असा चौघांचा सलग चार दिवसांत मृत्यू झाल्याने घेरडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घरातील कर्ती माणसं गेल्याने माने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रमोद माने यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, बंधू डॉ. प्रवीण माने, भावजई असा परिवार आहे.
घेरडी येथील प्राथमिक शिक्षक प्रमोद वसंतराव माने हे घेरडी अंतर्गत देवकतेवाडी येथील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. ते पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी ड्यूटीवर गेले होते. मतदान प्रक्रियेचे काम संपवून घरी आल्यानंतर दोन-तीन दिवसांनी त्यांना त्रास जाणवू लागला. सुरुवातीचे दोन दिवस त्यांनी दुखणे अंगावर काढून गावातच उपचार घेतले. त्रास जास्त जाणवू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना कोरोना चाचणी करण्यास सांगितले. त्यात त्यांचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर कुटुंबाची धावाधाव सुरू झाली आणि त्यांना सांगोल्यातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र संसर्ग अधिकच बळावल्यामुळे त्यांचे बंधू डाॅ. प्रवीण माने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला घेऊन गेले. त्या ठिकाणी खूप प्रयत्न करूनही काही उपयोग झाला नाही. शेवटी प्रमोद माने यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. घरातील कर्ता माणूस गेल्याने माने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
दैव एवढ्यावरच थांबले नाही. प्रमोदच्या संपर्कामुळे घरातील वडील सेवानिवृत्त शिक्षक वसंतराव माने, आई शशिकला वसंतराव माने, मावशी जया घोरपडे व प्रमोदची पत्नी, मुलगा असे पाच जण एकाच वेळी कोरोनाबाधित झाले.
वडील वसंतराव माने व मावशी जया घोरपडे यांच्यावर सांगोल्यात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान दोघांचेही निधन झाले. प्रमोदची आई शशिकला माने, पत्नी व मुलावरही उपचार चालू होते. मात्र गंभीर अवस्थेत मृत्यूशी झुंज देताना शुक्रवारी आई शशिकला माने यांचाही मृत्यू झाल्याने डॉ. प्रवीण माने व प्रशांत माने कुटुंब नि:शब्द झाले आहे. दरम्यान, प्रमोद माने यांची पत्नी व मुलगा कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.
दोन्ही घरे कुलूपबंद
प्रमोद माने हे पत्नी व मुलासह घेरडीअंतर्गत शिवशंभू नगर, तर वडील, आई व मावशी गावातील शिवाजी चौकात एकत्र राहत होते. त्यांचे बंधू डॉ. प्रवीण माने व प्रशांत माने मुंबईत राहतात. कोरोनामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्यामुळे दोन्ही घरे कुलूपबंद असल्याने परिसरात शुकशुकाट होता.