जिल्ह्यात तीन महिन्यात ४६९ जण झाले बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:22 AM2021-04-02T04:22:24+5:302021-04-02T04:22:24+5:30
सोलापूर : शहर व ग्रामीणमधून व्यक्तींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. तीन महिन्यात ४६९ लोक बेपत्ता झाले आहेत. सोलापूर ...
सोलापूर : शहर व ग्रामीणमधून व्यक्तींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. तीन महिन्यात ४६९ लोक बेपत्ता झाले आहेत. सोलापूर शहरात १२८ तर ग्रामीण भागात ३४१ असे ४६९ जण बेपत्ता झाले आहेत. जिल्ह्यात सरासरी महिन्याला शंभराच्यावर तर दररोज पाच व्यक्ती हरवत असल्याच्या तक्रारी पोलीस स्टेशनला दाखल होत आहेत. छोट्या-छोट्या कारणांवरून घरातून निघून जाण्याचे प्रमाण वाढत आहे.
वर्षभरात घरगुती भांडणे, आर्थिक विवचंना, प्रेमप्रकरण, आजारपण, विकृती, पती-पत्नीतील वाद, कौटुंबिक कलह, अपयशाने खचून गेलेले, एखाद्या गोष्टीला कुटुंबाकडून होणाऱ्या संभाव्य विरोधामुळे, अभ्यासाचे टेंशन तर कधी प्रेम प्रकरण अशा अनेक कारणांनी घर सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून हे प्रमाण १३०० वर पोहोचले आहे. सोलापूर जिल्ह्यात महिन्याकाठी हे प्रमाण सरासरी शंभरावर आहे. बऱ्याचदा बेपत्ता झालेले काही दिवसांनी पुन्हा घरी परततात. घरी परतणाऱ्यांचे प्रमाण ८० टक्के असले, तरी उर्वरित २० टक्के लोक जातात कुठे? हा संशोधनाचा विषय आहे.
सोलापूर शहरात सात तर ग्रामीण भागात २५ अशी ३२ पोलीस ठाणी जिल्ह्यात कार्यरत आहेत. १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च या कालावधीत सोलापूर शहरातील सात पोलीस ठाण्यात ५४ पुरुष व ७४ महिला असे १२८ जण बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. ग्रामीण भागातील २५ पोलीस ठाण्यात १३० पुरुष व २११ महिला असे ३४१ जण बेपत्ता असल्याच्या तक्रारी दाखल आहेत.
---
महिला आणि अल्पवयीन मुलींचे प्रमाण सर्वाधिक
गेल्या तीन महिन्यात बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होणे ही बाब अतिशय गंभीर मानली जात आहे. सोलापूर जिल्ह्यात बेपत्ता महिलांची संख्या जास्त असल्याने मिसिंग नोंद झालेल्या तक्रारीवरून दिसून येत आहे. अनेकदा छोट्या घटनांमुळे मुले-मुली नाराज होऊन घरातून पळून जातात. घरगुती ताण-तणावांमुळे बिघडलेली मानसिक स्थिती वृद्ध आणि महिलांच्या बेपत्ता होण्यास कारणीभूत असल्याचे मत पोलिसांकडून व्यक्त केले आहे.
---
२८५ महिला व १८४ पुरुष बेपत्ता
सोलापूर शहरात जानेवारी महिन्यात १९ महिला आणि १६ पुरुष असे ३५, फेब्रुवारीत २५ महिला आणि १५ पुरुष असे एकूण ४० व्यक्ती बेपत्ता झाले आहेत. मार्च महिन्यात २५ महिला आणि २३ पुरुष ४८ अशी एकूण १२८ जणांची तर ग्रामीण भागात जानेवारी महिन्यात ५७ महिला आणि ५१ पुरुष असे १०८ बेपत्ता आहेत. फेब्रुवारीत ७७ महिला आणि ४० पुरुष असे एकूण ११७ लोक बेपत्ता झाले. मार्च महिन्यात ७६ महिला आणि ३९ पुरुष असे ११५ जण बेपत्ता झाले. अशा प्रकारे २८५ महिला व १८४ पुरुष मिळून ४६९ व्यक्ती बेपत्ता नोंद झाली आहे.